सातारा भूषण पुरस्कार 2024 प्रदान कार्यक्रम दि. 23 मार्च रोजी

by Team Satara Today | published on : 20 March 2025


सातारा : रा.ना. गोडबोले(सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्कार देण्यात येतो. २०२४ चा ३४ वा पुरस्कार डॉ. सुरेश भोसले यांना देण्यात येणार आहे.

सातारा भूषण पुरस्कार 2024 प्रदान कार्यक्रम येत्या रविवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र सातारा येथे संपन्न होत आहे. सातारा येथील ज्येष्ठ उद्योजक व कुपर उद्योगसमूहाचे प्रमुख माननीय फरोख कूपर यांच्या शुभहस्ते व सातारा येथील जेष्ठ विचारवंत व लेखक डाॅ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना .श्री छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कला, क्रिडा, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या व आपल्या उत्तुंग यशाने साताऱ्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना १९९१ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.

आतापर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, छोटा गंधर्व, सयाजी शिंदे, राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, यमुनाबाई वाईकर, फारूख कूपर, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रताप गंगावणे, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. रणजित जगताप यासारख्या दिग्गज व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड चे कुलगुरू आहेत. डॉ. भोसले हे नामांकित सर्जन असून मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर १९८५ पासून कृष्णा इन्स्टियूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड येथे त्यांनी कार्य सुरू केले. प्रोफेसर, विभाग प्रमुख पासून ते कुलपतीपदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या ते सांभाळत आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन म्हणून ते काम बघतात. २०१९ पासून कुलपती, कृष्णा विश्व विद्यापीठ ही जबाबदारी ते कौशल्याने पार पाडत आहेत. कृष्णा हॉस्पिटलचा विस्तार, आधुनिकीकरण व त्यामार्फत समाजसेवा, सभासद शेतकऱ्यांचे हीत ते बघत आहेत. आता शिरवळ येथे नवीन कॉलेज व विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.

याशिवाय सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. कृष्णा सह. साखर कारखान्याचे, १९९९ पासून चेअरमन आहेत. ४५००० सभासद व २००० कामगारांचे हित बघत त्यांचे जीवनमान उंचावण्याचा ते प्रयत्न करत आहेत, कृष्णा सह. साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारखान्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कारखान्यामार्फत एथेनॉल व अल्कोहोल निर्मितीही करण्यात येते. २००७ साली त्यांनी जयवंत शुगर्स हा नवीन कारखाना सुरू केला. २००३ साली कृष्णा शेतकी कॉलेज सुरू केले. कृष्णा सह. बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे.

कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख,कृष्णा सहकारी बँक व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ,कृषी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रमुख तसेच कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय ते कृष्णा विश्व विद्यापीठ या दैदिप्यमान प्रवासाचे शिल्पकार, कोरोना काळात विशेष रुग्णसेवा करणारे कर्मयोगी व्यक्तिमत्व असे डॉ. सुरेश भोसले, कराड यांना हा 2024 चा 34 वा सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोरोना काळातही अतुलनीय कार्य करणाऱ्या या थोर व्यक्तीची निवड रा.ना. गोडबोले ट्रस्टतर्फे अरूण गोडबोले, प्रा. पुरुषोतम शेठ, .ना.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवड समितीच्या द्वारे करण्यात आली आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने  ट्रस्टी अशोक गोडबोले, उदयन् गोडबोले, व डॉ.अच्युत गोडबोले यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा
पुढील बातमी
शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन

संबंधित बातम्या