कराड : डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील पद असून, धर्मादाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्वाचे असतात. धर्मादाय हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात. याची माहिती आपणास नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या हॉस्पिटलच्या पिळवणूकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात माजी खासदार (स्व.) प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे तसेच रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (स्व.) प्रेमीलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव सौ. गौरीताई राहूल चव्हाण, सौ. मंगलवहिनी अधिकराव चव्हाण, अजित राव पाटील - चिखलीकर, भानुदास माळी, प्रमोद पाटील, संजय ओसवाल, संतोष शेलार, युवा नेते राहुल चव्हाण, इंद्रजित चव्हाण, झाकीर पठाण, नामदेवराव पाटील, निवासराव थोरात, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, सिद्धार्थ थोरवडे, नानासो जाधव, उदय थोरात, संजय तडाखे, योगेश लादे, अमित जाधव, संग्राम पवार, सतीश पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, उदय आबा पाटील, अविनाश नलवडे, अवधूत पाटील, सुनील बरीदे यांच्यासह कराड शहर व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, पूर्वी एड्स हा रोग एखाद्या माणसाच्या चारित्र्यावर बोट ठेवणारा होता. एखाद्या रुग्णाचा आजार जाहीर न करणे हा नियम आहे. पण या नियमाचे उल्लंघन होताना दिसते. याबाबत वैद्यकीय क्षेत्रात दंड अथवा शिक्षेची तरतूद नाही. एखाद्यास आर्थिक मदत करताना झाकली मूठ सव्वालाख याप्रमाणे असावी. एमआरआय मशीन बाहेरच्या देशातून आणल्याने टॅक्सचा भुर्दंड सर्वसामान्य लोकांना सोसावा लागतो.
ते म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा विषय जागृतीसाठी आणणे महत्वाचे आहे. वैद्यकीय मदत कशी मिळवावी, हे अभ्यासक्रमात नसल्याची खंत वाटते. याबाबत साहित्यिक क्षेत्रात लिखित नसून, चित्रपटात दाखवले जात नाही, हीदेखील शोकांतिका आहे. एखाद्याचे एक लाख साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल, तर चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये पूर्ण बील माफ होते. व तीन लाख साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर निम्मे बील माफ होते.
ते म्हणाले, समाजसेवी संस्था व धर्मादाय संस्था ह्या समाजाच्या गरजेसाठी व विकासासाठी असतात. कोरोनाच्या संकटकाळात मदतीसाठी काढलेल्या संस्था व ट्रस्टने लोकांची लूट केली. रुग्णांचे हक्क व अधिकारांवर दररोज दरोडे पडत आहेत. याकरिता सर्वसामान्य लोकं जागृत झाली पाहिजेत.
चव्हाण पुढे म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम महागडा आहे, हे मान्य आहे. याच शिक्षणासाठी देश व राज्याच्या बजेट मध्ये तरतूद केल्यास हे शिक्षण सुलभ होईल. मोफत वैद्यकीय शिक्षण घेतलेला डॉक्टर हा रुग्णांचे आर्थिक नुकसान टाळणारा असेल. जोपर्यंत ह्रुदयात माणुसकीची भावना तयार होणार नाही. तोपर्यंत वैद्यकीय क्षेत्र विचाराच्या पलिकडे असेल.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडकरांच्या मनात आरोग्य विषयी कुतूहल जागृत व्हावे. रुग्णांना हक्क व अधिकार दिले आहेत ते समजले पाहिजेत. नक्की व्यवस्थेत दोष आहे. परंतु इंग्लंड व अमेरिकेमध्ये शंभर टक्के उपचार मोफत होतात. याच पद्धतीने आपल्या देशात शंभर टक्के उपचार शासकीय खर्चाने झाले पाहिजेत. व त्यासाठी तरतूद झाली पाहिजे. विकसित राष्ट्र निर्माण करताना उपचार मोफत झाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी चार ते साडेचार टक्के तरतूद झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार होतील. यासाठी आग्रह धरला पाहिजे.
सौ. गौरीताई राहूल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या सेवाभावी विचासरणीच्या प्रेरणेने चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती झाली. या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून समाज उपयोगी उपक्रम घेतले जात आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेश चव्हाण यांचे स्वागत केले. सचिन तडाखे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.