मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. त्यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून केली. या वर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकरयांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ₹ 10 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक यासह दिला जातो.
चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप ₹ 6 लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाच्या स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे ₹ 10 लाख व ₹ 6 लाखांचे स्वरूप आहे. तसेच, 1993 पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ₹ 10 लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल यांसह दिला जातो.
सर्व पुरस्कारांचे वितरण 25 एप्रिल 2025 रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे. या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमक आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेतून दिली.