सातारा : क्षेत्रमाहुली येथील कृष्णामाई घाटावर शूटिंग सुरू असताना पैशांची मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रेयश शशिकांत कटकधोड (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. तर अक्षय जाधव (रा. सातारा) याच्यावर याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून फलटण ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दि. १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्षेत्रमाहुली येथील कृष्णामाई घाटावर शूटिंग सुरू असताना संशयित आरोपीने येथे शूटिंग करायचे नाही असे सांगत २५ हजार रुपयांची मागणी केली. तसेच शूटिंग सुरू असताना मध्येच बंद करण्यास भाग पाडत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. यानंतर फिर्यादीने त्याला बाजूला घेऊन त्याच्या मागणीनुसार २० हजार रुपये रोख दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.