रहिमतपूर-तासगाव मार्गावर दुर्घटनेत महिलेचा मृत्यू; कारची झाडाला धडक; अन्य गंभीर जखमी दोघांवर उपचार सुरु

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : सातारा-रहिमतपूर-तासगाव मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तासगाव परिसरातील चिरेबंदी हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरसाळे (ता. खटाव) येथील काहीजण इनोव्हा कारमधून प्रवास करत असताना वाहन अचानक नियंत्रणाबाहेर गेले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की वाहन अनेक वेळा पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातात सौ. सुनीता धनाजी जाधव (वय 36, रा. गुरसाळे) यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी त्या वाहनाबाहेर फेकल्या गेल्याने गंभीर दुखापत झाली. दुर्घटनेनंतर त्या वाहनाखाली अडकल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

श्री.छ.शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम व हायवे रेस्क्यू टीमच्या जवानांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवत महिलेला बाहेर काढले. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, अमर लतीफ मुलाणी (वय 33) आणि धनाजी शिवाजी जाधव (वय 48) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका व बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. वाहनाचा वेग, चालकाचा ताबा सुटणे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अपघात घडला का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राधिका रोड परिसरात युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
घरकुल योजनेतील लाभासाठी हजारे कुटुंबीयांचा न्यायाची मागणी; जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन; आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या