सातारा : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे सन 2025-26 च्या गळित हंगामामध्ये गाळपास येणार्या उसाला प्रति मेट्रिक टन तीन हजार 350 रुपये देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मडळाच्या सभेत झाल्याची माहिती व्हाइस चेअरमन प्रमोद शिदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शेतकर्यांच्या सहकार्याने दोन्ही कारखान्यांमध्ये गाळपाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने योग्य नियोजन केल्याने, किसन वीर कारखान्यात प्रतिदिन 5200 व खंडाळा कारखान्यात 3200 मेट्रिक टन गाळप सुरू आहे. कारखान्याचे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प सुरू आहेत. दोन्ही कारखान्यांचे वजनकाटे अचूक असल्याने, शेतकर्यांमध्ये व्यवस्थापनापद्दल विश्वास आहे. गेल्या तीन हंगामांमध्ये शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदारांची सर्व देयके देण्यात आल्याचा चांगला परिणाम या हंगामात दिसून येत आहे. त्यामुळे हंगामात सुरुवातीपासूनच दोन्ही कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होत आहे.
किसन वीर कारखान्यात गेल्या 42 दिवसांत दोन लाख आठ हजार 550 मेट्रिक टन आणि खंडाळा कारखान्यात 44 दिवसांत एक लाख 25 हजार 850 मेट्रिक टन गाळप झाले आहे. किसन वीरच्या को-जनरेशन प्रकल्पातून एक कोटी 71 लाख 82 हजार युनिट वीज नर्मिती झाली असून, एक कोटी आठ लाख 9 हजार 417 युनिट वीज एक्सपोर्ट करण्यात आली आहे. खंडाळा कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातून 83 लाख 30 हजार युनिट वीजेनिर्मिती झाली असून, 50 लाख 10 हजार युनिटची वीज एक्सपोर्ट करण्यात आलेली आहे. दोन्ही कारखान्यांमधील गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकर्यांनी आपला संपूर्ण ऊस या दोन्ही कारखान्यांना घालावा, असे आवाहन चेअरमन मकरंदा पाटील, व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाइस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व दोन्ही कारखान्यांच्या संचालकांनी केले आहे.