मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्च्यादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमारानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाचा आणि विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी भूमिका मांडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी केलेली मागणी खोत यांनी थेट फेटाळून लावली असून, देशात अशांतता पसरवणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, या सर्व प्रकरणामागे एक मोठे षडयंत्र आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून दोषींना कठोर शिक्षा करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत व्यस्त असताना, ज्यांचा या विषयाशी काहीही संबंध नाही असे लोक राजकारणासाठी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
आपल्या वक्तव्यात खोत यांनी विरोधकांच्या रणनीतीची तुलना दहशतवादी विचारसरणीशी केली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी देशात आणि राज्यात दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. लोकशाही मार्गाने अशा प्रवृत्तींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
मात्र, या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर खोत यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलं."नीट परीक्षेचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही. काही विद्यार्थी प्रामाणिकपणे लढा देत आहेत. पण भाजप विरोधी जी आघाडी आहे ती देशाला अस्थिर करण्यासाठी आतंकवादी विचार पसरवत आहेत. मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी म्हणत नाहीये," असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत संबंध नाही- सदाभाऊ खोत
"देशात विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरुय त्यातून काही संघटना आणि इंडिया आघाडीचे पक्ष संपूर्ण देशात आतंकवाद्यांसारखे विचार पसरवत आहेत. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत आम्ही त्याच्या सोबत आहे. पण याचा आधार घेऊन अनेक लोक राजकारण करत आहेत आणि मी त्याचा विरोध करतो. मीसुद्धा विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतला आहे. आता नीटच्या विरोधात आंदोलन सुरुय की सरकार हटवण्यासाठी आंदोलन आहे हे समजत नाहीये. हे आंदोलन दिशाहीन झाले आहे. या आंदोलनातून दंगल घडवण्याचे प्रयत्न केले जात आहे हे स्पष्ट होत आहे. नीटच्या प्रकरणात दोषींवर कारवाई झाली आहे. परीक्षासुद्धा झालीय मग आंदोलन कशाला करताय? धर्मेंद्र प्रधान यांचा याच्याशी सरळ सरळ काही संबंध नाही. त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत," असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.