सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शाहूपुरीतील संकल्प कॉलनीमधील मुख्य रस्ता डांबरीकरण कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी भारत भोसले, ‘मास’चे माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. निर्मलाताई दुधाणे, सौ. माधवीताई शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कॉलनीतील रहिवाशांनी रस्ता डांबरीकरण व गटार बांधकामाची मागणी अनेक दिवसांपासून केली होती.
या मागणीस अनुसरून भारत भोसले, राजेंद्रकुमार मोहिते व सौ. माधवीताई शेटे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. सुरुवातीस रस्त्याचे खडीकरण होणार असून दिवाळीनंतर रस्त्यांचे डांबरीकरण काम पूर्ण होणार आहे. या भागातील इतर समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तसेच त्यातील अडचणींचा आढावा घेताना यावेळी भारत भोसले यांनी रस्त्यावर येणारे पाणी रोखण्यासाठी मोठे पाइपड्रेनचे काम, रस्ता सुरक्षेसाठी १५ फूट लांबीची संरक्षक भिंत बांधणे या कामांचाही याअंतर्गत समावेश असल्याचे सांगितले. मुख्य रस्ता, पाणी, पथदिवे व गटार या चार प्रश्नांपैकी रस्ते, दिवे व पाणी या तीन समस्या सोडविण्यामध्ये यश आले असून उर्वरित गटार कामाचाही प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे असून लवकरच त्यास मान्यता मिळून हा प्रश्नही मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजेंद्रकुमार मोहिते म्हणाले, ‘‘या वॉर्डमधील विविध प्रश्नांना ग्रामपंचायत काळात न्याय देता आला. यापुढील काळातही नागरिकांनी अत्यंत जागृत राहून विकास कामांना न्याय देणारे, जनतेच्या प्रश्नांची जाण आहे अशा भारत भोसले यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सौ. निर्मलाताई दुधाणे व अमोल गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक दुधाणे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत कुलकर्णी, श्रीराम देशिंगकर, राजेंद्र देशमुख, महेश भिसे, पंकज दुधाणे, वामन गुरव, सौ. अंजली भोसले, शांताताई जावळे, मनीषा अडागळे, उमा खुडे, चिन्मय घाडगे, सुमित शेटे आदी उपस्थित होते.