कोळकी येथे खाजगी क्लासमध्ये बालकाला मारहाण; इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करून घेतल्याप्रकरणी शिक्षिकेसह इतरांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 22 October 2026


फलटण : फलटण तालुक्यातील कोळकी येथील एका खाजगी क्लासमध्ये खेळण्याच्या किरकोळ वादातून पाचवीच्या बालकाला शिक्षिकेने स्वतःसह वरिष्ठ आणि सज्ञान विद्यार्थ्यांकडून काठीने व हाताने बेदम मारहाण करून घेतल्याची संतापजनक घटना घडली आहे. या गंभीर प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिका आणि सज्ञान विद्यार्थ्यांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळकी येथील कवडे क्लासेसमध्ये हा बालक पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी वर्गात खेळत असताना काही कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून क्लासमधील शिक्षिका आश्विनी माने यांनी पीडित बालकाला नववी व दहावीच्या वर्गातील मुलांसमोर बोलावून घेतले. त्यानंतर शिक्षिकेने स्वतः त्या बालकाला काठीने व हाताने मारहाण केलीच, शिवाय क्लासमधील वरिष्ठ व सज्ञान विद्यार्थ्यांनाही त्या बालकाला मारहाण करण्यास सांगून त्यांच्याकडून मारहाण करवून घेतली.
क्लास संपल्यानंतर घरी परतल्यावर बालकाच्या अंगावर मारहाणीचे गंभीर वण आणि लाल-काळे पट्टे पालकांच्या निदर्शनास आले. पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर बालकाने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलाची शारीरिक अवस्था पाहot पालकांनी तातडीने त्याला उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले, जिथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
या प्रकरणी पीडित बालकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलिसांनी शिक्षिका आश्विनी माने तसेच या मारहाणीत सहभागी असणाऱ्या सज्ञान विद्यार्थ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३(५) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा कलम ७५ अन्वये कायदेशीर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली जाधव यांच्यामार्फत केला जात आहे.
खाजगी क्लासेसच्या मनमानी कारभारावर संताप
सध्या फलटण शहर व ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनेक खाजगी शिकवण्या आणि कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या लहान मुला-मुलींवर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शिक्षिकांसारख्या जबाबदार व्यक्तींकडूनच लहान बालकांना अशा प्रकारे सज्ञान विद्यार्थ्यांच्या मार्फत मारहाण करवून घेणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, अशा अरेरावी करणाऱ्या खाजगी क्लासेसवर शिक्षण विभाग व प्रशासनाने तातडीने वचक निर्माण करावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांमधून व पालकांकडून केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या: वाढे फाटा येथील मुलींच्या वसतिगृहात घेतला गळफास

संबंधित बातम्या