सांगवी : विडणी (ता. फलटण) येथे उघडकीस आलेल्या महिलेच्या निर्घृण खुनाबाबत आज तिसऱ्या दिवशीही पाेलिसांचे शोधकार्य सुरूच होते. काल मृतदेहाचे हात सापडले तर सोमवारी हत्यारे सापडल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, ५०० मीटर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, की विडणी येथील शेतात एका महिलेचा कंबरेखालील अर्धवट मृतदेह व कवटी आढळून आली होती, तसेच पूजेचे साहित्यही सापडले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
त्यामुळे तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. मृतदेहाचे उर्वरित भाग शोधण्यासाठी परिसरातील १५ ते १६ एकरांतील ऊस तोडण्याचे काम सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळापासून ५०० मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे.
दरम्यान, महिलेच्या शरीराचा कवटी व कंबरेखालचा भाग व काल हात सापडला असून, उर्वरित भागाचा अद्यापही शोध सुरू आहे. सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच आज पोलिसांना तीन हत्यारे सापडली असून, त्यावरील हाताचे ठसे, रक्ताचे नमुने घेण्यासाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले आहे. शरीराचा उर्वरित भाग शोधण्यासाठी परिसरात पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.