सातारा : राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून, सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धनासाठी १३४.८० कोटी रुपये, तर संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांबाबत शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली.
बैठकीस ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्रातील गड-किल्ले हे राज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असून त्यांचे जतन आणि संवर्धन ही शासनाची प्राथमिकता आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असल्याने त्यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता, आरोग्य सेवा आणि पर्यटनपूरक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
अजिंक्यतारा किल्ल्याचा होणार सर्वांगीण विकास
सातारा शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसराचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १३४.८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
या आराखड्यात किल्ल्याचे जतन व संवर्धन, बुरुजांचे पुनरुज्जीवन, राजसदरेचे संवर्धन, अत्याधुनिक लटकता पूल, पर्यटनासाठी आकर्षक स्थळांची निर्मिती, प्रेक्षक गॅलरी, नवीन पादचारी मार्ग, लँडस्केपिंग, स्वच्छता व विश्रांतीगृहे आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा यांचा समावेश आहे. सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या.
संगम माहुली समाधी स्थळाला जागतिक दर्जा
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून परिसराचा लँडस्केप विकासही केला जाणार आहे.
याशिवाय ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज, व्ह्यूइंग गॅलरी, सुसज्ज पाथवे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे संगम माहुली परिसराला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळणार असून जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार आहे.
या वेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धन आराखडा तसेच संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले.