सातारा : आपल्या काही मागण्यांसाठी सातार्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरीत्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तब्बल सातव्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांच्या हातून लिंबू सरबत पिऊन दिव्यांगांनी हे आंदोलन स्थगित केले.
दिव्यांगांना संजय गांधी पेन्शन योजना अंतर्गत सहा हजार रुपये मिळावेत, दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी 274 स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी, त्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, दिव्यांगांसाठी प्रतिवर्षी 30 लाख रुपये निधी खर्च करावा, सर्व बँक, शासकीय कार्यालय येथे दिव्यांगांसाठी रॅम्प बनवण्यात यावेत तसेच व्हिलचेअर सुविधा पुरविण्यात यावी, अंत्योदय व दारिद्य्ररेषेखालील यादीतील दिव्यांगांना सरसकट 35 किलो धान्याचे वितरण करावे, शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेसह अन्य संघटनांच्या पदाधिकार्यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, यानंतर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपोषणस्थळी जाऊन दिव्यांग बांधवांची समजूत घातली होती. याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या मागण्यांबाबतही सकारात्मकता दाखवली होती.
या आंदोलनामध्ये दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष शैलेंद्र बोर्डे, सदस्य अविनाश कुलकर्णी, दिव्यांग फौंडेशन प्रणित संघटनेचे अध्यक्ष नामदेवराव इंगळे, मानाजी लोहार आदींनी सहभाग घेतला होता.
दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांसाठीच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही प्रशासनाने प्रत्येक वेळी आश्वासनांची नुसती खैरात वाटली. मुंबई, दिल्लीमध्येही या बांधवांनी आंदोलने करून दुर्लक्ष होत असल्याने व प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याच्या निषेधार्थ सातार्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी आग्रही भूमिका दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी घेतली होती. तसेच या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांच्या जिवीतास काही हानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असाही इशारा पवार यांनी दिला होता.
काल दि. 13 रोजी माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू हे शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या अनुषंगाने सातारमध्ये आले होते. त्यांनी त्यानंतर आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांची भेट घेतली. याचबरोबर आंदोलनकर्ते अजय पवार यांच्याकडून आंदोलनाची परिस्थिती समजून घेतली. यानंतर बच्चू कडू यांनी अधिकार्यांना फोनवरून योग्य त्याना सूचना दिल्या आणि शनिवारी दिनांक 17 मे रोजी सर्व अधिकार्यांबरोबर बैठक घेण्याचे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सांगून तशी मीटिंग अरेंज केल्याचे पत्र आंदोलनकर्ते अजय पवार यांच्यासह आंदोलनकर्त्यांना दिले. यानंतर त्यांच्याच हस्ते लिंबू सरबत पिऊन दिव्यांग बांधवांनी त्यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.
यावेळी नितीन शिंदे, सुदर्शन मालवणकर, बाळासाहेब रवले, पांडूरंग शेलार, दिलिप गार्डे, हरिभाऊ साळुंखे, मारुती माने, संजय कुर्लेकर, संजय प्रकाशे, अमोल भातुसे, माधुरी माधव, लतिका जगताप, सुनिता ओंबळे, शालन लोखंडे, चंपाबाई क्षीरसागर, शोभा मोरे, वनिता जाधव, स्त्री शक्ती ग्रूपच्या 50 सदस्यांची उपस्थिती होती.