सातारा : जिल्ह्यातील फलटण येथे छळ सहन केल्यानंतर डॉ. संपदा मुंडे यांनी केलेल्या आत्महत्याकडे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाचा विवेक हादरवून टाकणारी एक शोकांतिका म्हणून पाहिले पाहिजे. इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बळकणारी एक हुशार डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी पडली अशा शब्दात काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी यांनी खंत व्यक्त केली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी अत्याचार आणि मानसिक त्रास व छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे.
‘जस्टीस फॉर संपदा’ अशा पद्धतीचा हॅशटॅग सोशल मीडियावर पोस्ट करत पुढे राहुल गांधी म्हणतात, गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी या निष्पाप महिलेबरोबर सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर अत्याचार करून शोषण करण्यात आले. संपदाने केलेली आत्महत्या हे सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही - संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोण करू शकते? डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूने या भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आला आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडीतेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारताच्या प्रत्येक मुलीसाठी आता भीती नाही, आम्हाला न्याय हवा आहे, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.