पुणे : गोखले इंन्स्टिट्यूटचा १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने वळविल्याप्रकरणात दाखल गुन्ह्यात गोखले इन्स्टिटूटसह सर्व्हंटस् ऑफ इंडियातील व्यवहारांचे फॉरेन्सीक ऑडीट होणार आहे. याखेरीज, संस्थांचे बायलॉज, युजीसी, एमओए, मिटींग मिनीटस् यांच्यासोबत दोन्ही संस्थाचे बुक ऑफ अकाउंट, ऑडीट रिपोर्ट, बँक स्टेटमेंट, लेजर आदींचे तज्ञांकडून सखोल विश्लेषण करून त्याबाबत सविस्तर अहवालासह तज्ञाकडून अभिप्राय मिळविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
याप्रकरणात, अटक केलेल्या सर्व्हंटस ऑफ इंडियाचा सचिव मिलिंद देशमुख याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला शुक्रवारी (दि. 11) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, न्यायालयाने देशमुख याच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत देशमुख याला न्यायालयीन कोठडी सुनावली. 25 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने देशमुख याचा मुक्काम येरवडा कारागृहात असणार आहे.
सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सरकारी वकील योगेश कदम म्हणाले की, आरोपीने केलेला गुन्हा हा क्लिष्ट स्वरुपाचा व गुंतागुंतीचा असून दोन मोठ्या संस्थामध्ये झालेल्या व्यवहाराचा असल्याने तपास अद्याप सुरू आहे. फिर्यादी यांनी पुरवणी जबाबाद्वारे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स यांच्या लेजर मधील नोंदीनुसार आणखी दहा लाख रुपये आरोपी यांनी वैयक्तिक फायद्यासाठी रानडे ट्रस्टच्या केसमधील अॅडव्होकेट फिजसाठी सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीचे खात्यावर वळविल्याबाबत तसेच लिफ्ट व कॅम्पस मेंटनन्स खर्चाबाबत गैरप्रकार झाल्याबाबत नमूद केले असल्याने त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
1) इन्स्टिट्यूटशी पत्रव्यवहार करत तीन वर्षातील ऑडिट रिपोर्ट, इन्स्टिट्यूटचे यु.जी.सी. बरोबरचे एम.ओ.ए. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट यांच्या मिटींगमधील मिनीटस प्राप्त केले आहे.
2) दोन्ही संस्थाच्या बँक खात्याशी संबंधित तपशील पोलिसांनी मिळविला आहे.
3) इन्स्टिट्यूटवर नेमणूक केलेल्या लेखा परिक्षक तसेच फायनान्स कमिटीतील सदस्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
4) संस्थेचे व्हॉईस चान्सलर यांच्याकडे तपास करत त्यांचा जबाब नोंदविला आहे.
5) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीच्या कार्यालयातील कागदपत्रे पंचनामा करून जप्त केली आहे.