पाचगणी : महाबळेश्वरमधील प्रसिद्ध विल्सन पॉइंटवर (सनराईज पॉइंट मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता पर्यटकांना सभोवतालच्या गाभा वनक्षेत्रात प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.
निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील प्रसिद्ध विल्सन पॉइंटवर (सनराईज पॉइंट) दररोज देश-विदेशातील हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, हे मुख्य प्रेक्षणीय ठिकाण सातारा वन विभागाच्या आधिपत्याखाली येत असून, ते एक ‘राखीव वनक्षेत्र’ आहे. या भागातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, भेकवली यांच्या वतीने पर्यटकांसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार असून, ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे पर्यटकांनी संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच आपली वाहने आवाराबाहेर काढून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत वनक्षेत्रात लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर येतात.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने स्पष्ट केले आहे, की वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, तसेच वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.