महाराष्ट्राच्या कन्या नीला विखे यांचा खासदार म्हणून स्वीडन संसदेत प्रवेश; विखे कुटुंबीयांची ख्याती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर

by Team Satara Today | published on : 20 September 2026


राहाता : शिक्षण, सहकार, आणि आरोग्य क्षेत्राशी घट्ट नाते असलेल्या विखे पाटील कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अहिल्यानगर ते स्वीडनची संसद असा प्रवास करणाऱ्या महाराष्ट्राच्या कन्या निला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. ग्रीन पार्टीच्या नेत्या असलेल्या निला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
निला या शिक्षण तज्ज्ञ डॉ. अशोक विखे पाटील यांच्या कन्या आणि आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणारे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांची नात व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांची पुतणी आहेत.
दि. १३ सप्टेंबरच्या निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून ४१ वर्षीय नीला विखे पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम करतांना अर्थ, कर व गृहनिर्माण विषय हाताळले आहे. स्टॉकहोम सिटी कौन्सिलवर त्यांची निवड झाली. त्यांनी शहरातील ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीत काम केले. निला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास केला असून, माद्रिद येथील कॉम्प्लुटेन्स विद्यापीठातही शिक्षण घेतले आहे.
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण अहिल्यानगरमध्ये गेले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी युरोपमध्ये शिक्षण घेतले. नीला यांच्या स्वीडिश संसदेतील प्रवेशाने विखे कुटुंबाच्या कार्याचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
आजोबांना अभिमान वाटेल असे काम करायचे आहे
विजयानंतर स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत सहभागी होताना आनंद होत आहे. स्टॉकहोम शहरासाठी आणि देशासाठी योगदान देण्यास आपण उत्सुक आहोत. माझ्या आजोबांना अभिमान वाटेल असे काम करायचे आहे. मी पंधरा वर्षाची असताना त्यांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता.

–निला विखे पाटील, खासदार,

खासदार निला स्वीडन नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील
आमच्या कुटुंबातील सदस्य एवढ्या मोठ्या पदावर निवडून जाणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. या यशाचा आनंद कुटुंबाबरोबरच लोणी ग्रामस्थांनाही आहे. बाळासाहेब विखे पाटील यांचाही प्रभावही निला विखे यांच्या कार्यपद्धतीमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. निला विखे यांनी यापूर्वी स्टॉकहोम नगरपरिषदेतही लोकप्रतिनिधी म्हणून काम करून आपल्या प्रभावी कार्याची छाप पाडली होती. तेथील नागरिकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात, याकरिता मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

–राधाकृष्ण विखे, जलसंपदा मंत्री


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटीच्या ताफ्यात अत्याधुनिक २०० ‘व्होल्वो’ बसेस; दर्जेदार प्रवासी सेवेला प्राधान्य दिले जाणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संबंधित बातम्या