जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे समूह व अदानी फाउंडेशनचा करार

by Team Satara Today | published on : 27 June 2025


वर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था आणि अहमदाबादस्थित अदानी फाउंडेशन यांच्यात देशांतर्गत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, शिक्षण व पायाभूत सुविधा अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्यासाठी सामंजस्य झाले आहे.  याबाबतची संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विश्वस्त व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदानी समूहाचे संचालक डॉ. मलय महादेविया यांनी गुरुवारी केली. 

संयुक्त बैठकीला कुलपती दत्ता मेघे, प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मेघे समूहाचे संचालक राघव समीर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, मेघे व अदानी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. करारानुसार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ध्येयधोरणांना कायम ठेवत दर्जेदार, नावीन्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा समावेश असलेले जागतिक दर्जाचे केंद्र विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रगत शिक्षण, संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा सामाजिक करार असल्याचे सांगण्यात आले.

कुलपती दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रगत वाटचाल पुढेही सुरू राहील, असे डॉ. मलय महादेविया यांनी सांगितले. मेघे शिक्षण व आरोग्य समूहातील सर्व कर्मचारी माझ्या परिवाराचे सदस्य असून मी कायम त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास सागर मेघे यांनी दिला.

मेघे संस्था ३५ वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत

1) ३५ वर्षांहून अधिक काळ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी आमची संस्था अदानी फाउंडेशनसोबत कार्यरत होत आहे, हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे कुलपती दत्ता मेघे यांनी सांगितले.

2) बैठकीत ऑनलाइन सहभागी होत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांनीही मेघे संस्थेसोबत सहकार्याच्या भावनेतून एकत्रित कार्य करताना दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आम्ही मानतो, असे स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आलिया भट्टने केले रेखाचे कौतुक
पुढील बातमी
जगन्नाथ रथयात्रेत तीन हत्ती अचानक बिथरले

संबंधित बातम्या