सातारा : माझी वसुंधरा योजनेत सलग तीन वर्षे राज्यात अव्वल आणि शाश्वत विकासाच्या नऊ थीमवर प्रभावी काम केले. यातून राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर पारितोषिके मिळाल्याने २०२४ या वर्षात तब्बल ३ कोटी ७० लाख बक्षिसांची रक्कम मान्याचीवाडीने मिळवत देशात सर्वोत्तम ग्रामपंचायत हा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान मिळाला. ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक घरावर सौर उर्जा युनिट बसवले आहे. येथील गावकऱ्यांनी ठराविक रक्कम एकत्रीत करुन कायम ठेव म्हणून ठेवली आहे. ठेवीवरील व्याजाच्या रक्कमेतून कर, पाणीपट्टी रक्कम घेऊन उर्वरित रक्कम दिवाळीला बोनस म्हणून देणारी देशातील मान्याचीवाडी ग्रामपंचायत असून लोकसहभागातून विकास आणि २५ वर्षांपासून बळकट ग्रामसभेतून घेतलेले निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी हाच यशस्वीतेचे गमक असल्याचे सरपंच रविंद्र माने यांनी देगाव येथे व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर देगाव (सातारा) येथे सुरू असून त्यात देशातील पहिले सौर उर्जा गाव म्हणून राष्ट्रपतींनी सन्मानित केलेल्या आणि माझी वसुंधरा योजनेत सलग तीन वर्षे राज्यात अव्वल ठरलेल्या आणि २५ वर्षात तब्बल ७८ पुरस्कार मिळवणाऱ्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी यशोगाथा सरपंच रविंद्र माने यांच्याकडून पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी उलगडली.
सक्षम ग्रामपंचायत सदस्य, बळकट ग्रामसभा, प्रत्येक निर्णय ग्रामसभेत, लोकसहभाग, २५ वर्षांपासून सातत्याने शासनाच्या प्रत्येक उपक्रमात पारितोषिक मिळविण्यासाठी नियोजन, १ एप्रिल रोजी १०० टक्के कर वसुली, आरोग्य, शिक्षण, सामाजिक स्वास्थ्य यासाठी विविध उपक्रम अशा अनेक अंगाने गावात होत असलेल्या उपक्रम, अभिमान, योजनांची अंमलबजावणी यशस्वी करत आज अखेर कोट्यवधी रुपयांची रक्कम पारितोषिकातून ग्रामपंचायतीला मिळाली असल्याचे रविंद्र माने यांनी सांगितले.
तर गटविकास अधिकारी सतिश बुध्दे यांनी," लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी केली तर देगाव सारखी गावे आदर्श म्हणून लौकिक मिळवू शकतात,"असे प्रतिपादन केले.
यावेळी देगावचे सरपंच वैशाली साळुंखे,छ. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे , नाम फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब शिंदे, माजी जि.प.सदस्य दत्तात्रय शिंदे, उपसरपंच अशोक ननावरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.नवनाथ इप्पर, स्वागत प्रा.विद्या नावडकर, तर आभार प्रा. डॉ.महादेव शिंदे यांनी मानले.
आदर्श गावांसाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
रविंद्र माने यांनी सातारा जिल्ह्यातील कोणत्याही गावाने सर्वांगिण विकासासाठी लोकसहभागातून नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारी घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा गावांना रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि ग्रामपंचायत मान्याचीवाडी संयुक्तपणे परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहे. तर लोकसहभागातून विकास साध्य करुन गावाचा लौकिक वाढविण्यासाठी महिला, युवकांचा सक्रिय सहभाग, जेष्ठांचे मार्गदर्शन आणि ग्रामसभेत चर्चा होऊन अशक्य ते शक्य करू आहे, असे आवाहन प्राचार्य विजय जाधव यांनी केले.