मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणासोबतच बीडमधील गुन्हेगारी, बंदुकीबाज या प्रकरणी आवाज उठवलाय. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत बीडचं पालकमंत्रीपद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं, अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची चहूबाजूने कोंडी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना देशमुख हत्या प्रकरणावरून खळबळजनक खुलासे केले होते. तसेच धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळू नये, अशी अप्रत्यक्ष व्यवस्था धस यांनी सभागृहाबाहेर आरोप प्रत्यारोप करून केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडी पथकांना आदेश दिले. या सीआयडी पथकाकडून वेगानं तपासही सुरू करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठी मागणी केलीय.
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप करत ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं असं आर्जव सुरेश धस यांनी केलंय. यापूर्वी धस यांच्यासह बीडमधील अनेक लोकप्रतिनिधींनी फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी केली होती.त्यावर फडणवीसांनी त्यांची प्रतिक्रियाही दिली होती.
यासंबंधीचे सर्व अधिकार आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांनी सांगेल तिथे मी काम करेन, मग ते बीड असोत किंवा इतर कोणताही जिल्हा असो. पुढच्या काही दिवसांत चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा अंतिम निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.