कासचे ऑनलाईन बुकिंग सुरू; फुलांचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार, सुट्टीच्या दिवशी ऑफलाईन पर्यटकांना मनाई

by Team Satara Today | published on : 28 August 2026


सातारा  : जागतिक वारसा स्थळ कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असून, प्रवेश शुल्क २०० रुपये आकारण्यात येणार आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी ऑफलाईन पर्यटकांना मनाई केली जाणार आहे. दरम्यान, ऑनलाईन बुकिंग कास पठाराच्या अधिकृत www.kas.ind.in या वेबसाईटवर सुरू करण्यात आले आहे.

कास पठारावर सद्यस्थितीत चवर फुलांचा बहर पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आता प्रवेश शुल्क दोनशे रुपये आकारले जाणार असून यामध्ये पार्किंग मोफत, पार्किंगपासून कास पठारापर्यंत बस सेवा मोफत, प्रति ग्रुप एक माहिती पत्रिका मोफत, कास पठारावरील एकीव वॉच टॉवर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुर्बीणमधून कण्हेर जलाशय व परिसराचे दर्शन मोफत पाहता येणार आहे.

कुमुदिनी तलाव वॉच टॉवर येथून दुर्बीणमधून कास तलाव परिसर दर्शन मोफत पाहता येणार आहे. तसेच राजमार्ग ते कुमुदिनी तलाव इलेक्ट्रिक बस करता प्रति व्यक्ती ये-जा करण्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार व इतर सुट्टीचे दिवस वगळता ४० रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. मात्र संबंधित प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे. गाईड शुल्क दोनशे रुपये असून किमान दहा लोकांच्या ग्रुप करिता एका तासासाठी हे शुल्क आकारले जाणार आहे. ऑनलाईन फक्त तीन हजार लोकांची मर्यादा असून माहिती पत्रिका वरील सूचनांचे पर्यटकांनी पालन करावे, असे आवाहन सातारा वनविभाग व कास पठार सहा गाव संवर्धन समितीकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबाबत नियम निश्चित; तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा
पुढील बातमी
पालकमंत्र्यांना ३० तर आमदारांना ७० टक्के निधी; महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत ‘डीपीसी’ निधी वाटपाचे नवे सूत्र, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

संबंधित बातम्या