सातारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिकांच्या डिझेल व टायरसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सेसमधून निधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद अर्थ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी विषयपत्रिकेवरील तसेच ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा सभापती सौ. तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदस्य विक्रांत डोंगरे, अजित साळुंखे, अमित चव्हाण, रूपाली सरगर, ज्योती मोरे, सारिका फाळके, मनिषा पाटील, वृषाली चव्हाण तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांच्या देखभाल व इंधन खर्चाचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला. शासनाकडून निधी न मिळाल्याने रुग्णवाहिका सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सेसमधून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेले काही अनुदान विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे खर्च होऊ न शकल्याने ते शासनाकडे परत जाण्याची वेळ आली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे विकासकामांना विलंब झाला असल्याने संबंधित अनुदान खर्च करण्यासाठी मुदतवाढ व परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच, जिल्हा परिषद सदस्य विविध विकासकामांच्या अनुषंगाने विभागांकडे पाठपुरावा करत असतात. त्यांना आवश्यक माहिती वेळेवर आणि स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.