दिल्ली : पोलिसांनी केलेल्या कारवाईत आमच्या एका बांधवाला पॅलेट गनचा मार बसला आहे. ती अशा वेळी लागली आहे, जेव्हा देशाचा तिरंगा हातात घेऊन शांतपणे आंदोलन सुरू होते. परंतु, सरकारने म्हटले आहे की, कोणतीही पॅलेट गन वापरली गेली नाही, असे सांगत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीका केली.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांच्यासोबत एक आंदोलक होता. त्याला पॅलेट गनचा मार लागल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याला पॅलेट गनचा मार लागून शरिराला जखमा झाल्याचे राहुल गांधी यांनी सर्वांना दाखवले. तसेच यामुळे त्याच्या डोळ्याला इजा झाली आहे. त्याला डोळ्यांनी काही पाहता येत नाही. हे आमच्या देशाचे भविष्य आहेत. याच्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला आहे. लाठीचार्ज करण्यात आला. मारहाण करण्यात आली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
६० ते ७० लाख रुपयात पेपर विकले गेले
हे सर्व जण शांततेत आंदोलन करत होते. आंदोलन का केले जात होते, कारण यांचा पेपर लीक झाला आहे. यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. मेहनत केली होती. एक दिवस यांना सांगितले की, पेपर लीक झाला आहे. तुमच्याकडे ६० ते ७० लाख रुपये नाहीत, ज्यांच्याकडे ६० ते ७० लाख रुपये आहेत, त्यांनी तो खरेदी केला. आता तुम्ही तुमचे काय ते पाहा, असा मोठा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारच्या समोर तीन मोठ्या मागण्या ठेवल्या.
राहुल गांधी यांनी सरकारसमोर कोणत्या ३ मोठ्या मागण्या ठेवल्या?
- सरकारने खोटे बोलणे थांबवावे. सरकारने आमच्या भविष्यावर आक्रमण केले आहे. शिक्षण मंत्र्यांमुळे विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यामुळे विद्यार्थी बाहेर पडले आहेत. शांततेत आंदोलन केले. त्यांच्यामुळे पेपर लीक झाला आहे. त्यांना काढून टाकले पाहिजे.
- दुसरी मागणी ही आहे की, ज्यांनी लाठीचार्ज केला, गोळीबार केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- तिसरी मागणी अशी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व व्यवस्थांचे चालक आहेत. त्यांनी हजारो तरुणांची माफी मागावी. अनेकांचे शारीरिक नुकसान झाले आहे. त्यांची काही चूक नाही.
- आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणे बंद करावे. त्यांना धमकावणे बंद करावे आणि आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, असे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.