सातारा : वाढे फाटा परिसरातील मोना स्कूलसमोर कारने मोटारसायकलला पाठीमागून धडक देत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 15 जुलै रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास आलोक शिवाजी जाधव (वय 18, रा. अंगापूर, ता. जि. सातारा) हा त्याचा मित्र विराज इंगवले (रा. डबेवाडी) याच्यासह स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एम.एच-11-बीएफ-6861) वरून डबेवाडीमार्गे वाढे फाट्याकडे जात होते.
त्यावेळी मोना स्कूलसमोरील रस्त्यावर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पांढर्या रंगाची व्हर्ना कार (क्र. एम.एच-11-बीएच-4241) मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच, फिर्यादीचा मित्र करण चव्हाण याच्यासोबत यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी ऋषिकेश उर्फ दाद्या पवार (रा. कोडोली), निखिल शेडगे (रा. काळोशी-कोडोली), अजित कराडे (रा. कारंडवाडी) आणि अतुल भगत (रा. गणेश चौक, कोडोली), ता. जि. सातारा यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.