सातारा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा यांच्या समन्वयाने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सातारा जिल्ह्यामधील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामी ठिकाणी विविध आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.
आरोग्य शिबीर २६ जून ते २९ जून २०२५ असे चार दिवस आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत विविध आरोग्य योजनांबाबत जनप्रबोधन केले जाणार आहे. तसेच नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, शल्यचिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, निदानात्मक, उपचारात्मक सोयीसुविधा, औषध पुरवठा व चरण सेवा (फिजिओथेरपी सर्विसेस) इत्यादी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कळविले आहे.