सातारा : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह कमेंट केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात संतापाचा भडका उडाला असून, सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खा. उदयनराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्याचे समजताच संतप्त झालेले समर्थक एकत्र आले. नगरसेवक पंकज चव्हाण, विजय बडेकर, समीर माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री थेट शहर पोलिस ठाणे गाठून संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटकेची जोरदार मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत ठाण्यात ठिय्या दिल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सायबर तांत्रिक बाबी तपासून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा समर्थक ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले. अखेर सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी पोलिसांनी दुपारी आठ जणांवर गुन्हा नोंदवला. या संशयितांची नावे निष्पन्न करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे कायदेशीर कारवाईनंतर संशयितांना वेगळा धडा शिकवू, असा इशारा उदयनराजेप्रेमींनी दिला आहे.