मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सातारा जिल्ह्यात तीन आरोग्य शिबिरे; सेरेब्रल पाल्सीग्रस्त 318 मुलांची तपासणी व उपचारासाठी मार्गदर्शन

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनच्या ‘मिशन सेरेब्रल पाल्सी’ उपक्रमाला 11वर्षे पूर्ण

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा  : व्हीलचेअर्स वाटप करण्याच्या छोट्या कार्यक्रमाने सुरु झालेल्या उपक्रमांतून हजारोंच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सीएसआर अंतर्गत उपक्रमांतील सर्वात प्रभावी आणि महत्वाचा असा 'मिशन सेरेब्रल पाल्सी' उपक्रम 11 वर्षे पूर्ण करीत आहे. सातारा, रत्नागिरी, गोवा (पर्वोरिम) आणि गुजरात (मसार) येथे १००० पेक्षा अधिक मुलांचे व त्यांच्या कुटुंबाचे जगणे बदलले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी सातारा जिल्ह्यात विशेष मूल्यमापन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ही शिबिरे  सातारा, वडूज आणि वाई येथे झाली. तिन्ही शिबिरांमध्ये मिळून एकूण ३१८ दिव्यांग मुलांनी वैद्यकीय तपासणी, मूल्यमापन आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी संचेती हॉस्पिटलचे बाल अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप पटवर्धन, जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ. तेजस्विनी कदम, उपशिक्षणाधिकारी श्री. देशमाने, खटावच्या शिक्षणाधिकारी सौ. गायकवाड, समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा प्रमुख  ज्ञानदेव शेलार, जिल्ह्यातील विशेष शिक्षक तसेच मुकुल माधव फाउंडेशनचे यास्मिन शेख, जितेंद्र जाधव, शाम निंबाळकर आणि संतोष शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्याची दखल घेऊन २०१६ मध्ये ‘मिशन सेरेब्रल पाल्सी’ उपक्रमाला ‘बीटी-सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. सातारा जिल्हा परिषदेकडूनही या उपक्रमाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
“‘मिशन सेरेब्रल पाल्सी’ हा केवळ आरोग्य प्रकल्प नसून, करुणा, पुनर्वसन आणि सक्षमीकरणाची चळवळ आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला आहे. समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फाउंडेशन यापुढेही सदैव कार्यरत राहील,” असे मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
या उपक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये झाली. सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सेरेब्रल पाल्सीग्रस्त ३१३ मुलांना व्हीलचेअर्स व कमोड चेअर्स देण्यासाठी फाउंडेशनकडे विनंती केली. प्रत्यक्ष पडताळणीत साताऱ्यात ५०७ मुले आढळली. त्यानंतर वर्षभरात फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने चीनहून आयात केलेल्या १७८ विशेष व्हीलचेअर्स (प्रत्येकी किंमत सुमारे १५,५०० रुपये) व १०४ कमोड चेअर्स मुलांना वाटप केल्या. परंतु यावेळी घराघरांत दिलेल्या भेटीदरम्यान लक्षात आले की मुलांना आवश्यक थेरपी मिळत नाही. यामुळे केवळ उपकरण नव्हे, तर सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा, थेरपी व समुदायाचा आधार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आणि 'मिशन सेरेब्रल पाल्सी'चा प्रवास सुरू झाला.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनखाली सुरु झालेला हा उपक्रम गेल्या दहा वर्षात अधिक व्यापक झाला आहे. संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व केईएम हॉस्पिटलच्या सहकार्यातून २५ हून अधिक मूल्यमापन शिबिरे आयोजित केली आहेत. पहिल्या शिबिरात ५०७ मुलांची ओळख पटली. सातारा, रत्नागिरी आणि इतर काही ठिकाणी ही शिबिरे झाली. त्यातून हजारो मुलांच्या आजाराचे निदान झाले आणि त्यांना पुनर्वसनासाठी सेवा देण्यास सुरुवात केली. आजघडीला साताऱ्यात सहा, रत्नागिरीत एक, गुजरातमध्ये एक आणि गोव्यात एक अशी एकूण ९ पुनर्वसन केंद्रे कार्यरत आहेत. येथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन, शस्त्रक्रियांसाठी साहाय्य व वैद्यकीय मदत पुरवली जाते.
यासह क्षमता विकास प्रकल्पांतर्गत १,३०० पेक्षा अधिक आशा व एएनएम कार्यकर्त्यांना गर्भावस्था काळजी, लवकर निदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २५० शाळाशिक्षक व ५० डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेतली गेली आहे. कोविड काळात ऑनलाइन थेरपी, टेलीकन्सल्टेशन, तसेच आर.के. टेलिव्हिजनवरून दैनंदिन व्यायाम व योग प्रक्षेपण सुरू होते. ७५ शस्त्रक्रिया, १९८ उपकरणांचे वाटप; तरुणांना रोजगारासाठी शिलाई मशीन, दुकान, मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अनेक मुलांनी शस्त्रक्रियेनंतर चालण्यास सुरुवात केली, पालकांना घरीच थेरपी देणे शक्य झाले. काही तरुणींना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. यापुढे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे, असे रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या.“मिशन सेरेब्रल पाल्सी हा केवळ आरोग्य प्रकल्प नाही, तर करुणा आणि सक्षमीकरणाची चळवळ आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी फाउंडेशन सदोदित कार्यरत राहील,” असे मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
सध्या सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, पाचगणी, वडूज, तारळे आणि खंडाळा या सहा ठिकाणी पुनर्वसन केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय रत्नागिरी, गुजरातमधील मसार आणि गोव्यातील पर्वोरिम येथे प्रत्येकी एक अशी एकूण नऊ पुनर्वसन केंद्रे सुरू आहेत.मुकुल माधव फाउंडेशनबबलू मोकळे,यास्मिन शेख आणि संतोष शेलार यांनी हे कॅम्प यशस्वी व्हावे याकरता विशेष मेहनत घेतली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात
पुढील बातमी
दुष्काळी कामांमध्ये महिलांचा सहभाग समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी : विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर, भुरकवडी वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ

संबंधित बातम्या