सातारा : मुखपृष्ठाकडे आपण जर बारकाईने बघितले तर पुस्तकांचा आशय यातूनच समजून घेऊ शकतो. परंतु आपल्याकडे पुस्तकांना आवरण घालून मुखपृष्ठ लपवून ठेवण्याची चुकीची पध्दत रूढ होत चालली आहे. त्यामुळे आपण चित्रांपासून लांब जात चाललो आहोत, असे मत प्रसिद्ध मुखपृष्ठकार व चित्रकार रवी मुकुल यांनी व्यक्त केले आहे.
येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि सातारा नगरपरिषद आणि श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित मुखपृष्ठाची गोष्ट या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसाप पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रसिध्द साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, डॉ. संदीप श्रोत्री, अजित कुबेर, मसाप, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत उपस्थित होते.
रवी मुकुल यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मुखपृष्ठाच्या पाठीमागची गोष्ट अत्यंत सुरेख पध्दतीने उलघडली. यावेळी बोलताना श्री. मुकुल म्हणाले, ८० च्या दशकापासून मुखपृष्ठ चित्र काढण्याची सुरुवात केली. लहानपणापासून आपण चित्र पाहूनच अबकड शकलो परंतु एकदा का अक्षरांची ओळख झाली की आपण चित्रापासून लांब जातो. आपण असे केले नाही पाहिजे चित्रांपासून आपल्याला खूप काही शिकता येते. नामवंत लेखकांच्या पुस्तकांना मुखपृष्ठ चित्र काढले आहे. या मुखपृष्ठाचे चित्र काढण्याच्या पाठीमागे ही अनेक गोष्टी दडल्या आहेत. जेव्हा मी प्रसिध्द कवी अरुणा ढेरे यांच्या कविता संग्रहाला मुखुपृष्ट चित्र काढले त्यावेळी कवी कुसुमाग्रज यांनी अरुणा ढेरे कवितेच्या पुस्तकाला रवी मुकुल यांच्या मुखपृष्ठाचे कोंदण लागले असल्याचे गौरवोद्गार काढले होते. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवी मुकुल यांनी नरेंद्र चपळगावकर यांच्या न्यायाच्या गोष्टी, नारायण धाराप यांचे लुंचाई, शिरीष काणेकर यांचे गाये चला जा, ग दि माडगूळकर यांचे मंतरलेले दिवस, तारा भवाळकर आणि रा. चि ढेरे यांचे महामाया आणि विजय तेंडुलकर यांचे ते दिवस या पुस्तकांवरील मुखपृष्ठाच्या पाठीमागील गोष्ट त्यांनी उपस्थिताना सांगितली.
प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषेला दर्जा मिळावण्यासाठी या शाखेने खूप संघर्ष केला आहे. यापुढेही केंद्राकडून मराठी भाषा संवर्धनासाठी निधी मिळवण्यासाठी शाहूपुरी शाखा वेळेप्रसंगी संघर्ष करणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. राजेंद्र माने, डॉ. संदीप श्रोत्री आणि अजित कुबेर यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन ॲड. चंद्रकांत बेबले केले तर आभार सौ. ज्योती कुलकर्णी यांनी मानले. यावेळी मसाप शाहूपुरी शाखेचे सचिन सावंत, वजीर नदाफ,अमर बेंद्रे, संजय माने, उमेश करंबळेकर, सौ. अश्विनी जठार व साहित्यप्रेमी सातारकर उपस्थित होते.
लेखक देवा झिंजाड यांची उद्या मुलाखत
मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्ममाने होत असलेल्या मराठी भाषा पंधरवड्यातंर्गत रविवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पाठक हॉल येथे 'एक भाकर तीन चुली' या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक देवा झिंजाड यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, मसाप, पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस हे मुलाखत घेणार आहेत. यावेळी विजय बडेकर, किशोर शिंदे, डॉ. चेतना माजगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी आणि सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.