कराड : पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूर येथील युनिक उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, सातारा-कोल्हापूर लेनवरील हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुलावरून वाहने सुसाट धावू लागल्याने कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मलकापूर शहरातील वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या या पुलावर सुरक्षा, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या उड्डाणपुलाच्या सातारा-कोल्हापूर लेनवरून तीन दिवस हलक्या आणि काही प्रमाणात अवजड वाहनांची प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक करून चाचणी घेण्यात आली होती. या दरम्यान वाहनांची क्षमता, वजनामुळे पुलावर निर्माण होणारे कंपण आणि वळणांवरील सुरक्षितता या तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. चाचणीनंतर जाणवलेले काही परिणाम आणि उर्वरित त्रुटी दूर करण्यासाठी पूल एक दिवस वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात पुलावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासह पथदिव्यांच्या खांबांची वीज जोडणी, संरक्षक कठडे, सुरक्षा बॅरिअर्स आणि मार्गदर्शक फलक लावण्याचे काम गतीने हाती घेण्यात आले आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण करत ही वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला, कोल्हापूर-सातारा लेनवरील कामेही आता अंतिम टप्प्यात आली असून साधारणतः ३० जूनपर्यंत ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर हलक्या वाहनांची स्वतंत्र चाचणी घेतली जाणार आहे. महामार्ग विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंच्या हलक्या वाहनांच्या चाचण्यांनंतर अवजड वाहनांची अंतिम चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतरच हा उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.