महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली

२४ तासांत १७३ मिलिमीटर पावसाची नोंद

by Team Satara Today | published on : 21 August 2025


महाबळेश्वर : येथे गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. थंडीत वाढ झाली आहे. येथील वेण्णालेक तलावातून वेण्णा नदी ओसंडून वाहत आहे. आज पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद झाली.

मुसळधारेने वेण्णालेक तुडुंब वाहू लागला आहे. लिंगमळा परिसर जलमय झाला आहे. महाबळेश्वर एसटी बसचे वेळापत्रक पावसामुळे कोलमडले आहे. पाचगणी- वाईकडून येणाऱ्या गाड्या उशिरा पोहोचत होत्या. संततधारेने शहर बाजारपेठेवर परिणाम झाला असून, दुकाने उशिरा उघडण्यात आली. पर्यटकांची रेलचेल मंदावली असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. थंडी वाढल्याने दुकानातून व्यापारी व नागरिक इलेक्ट्रिक शेगड्या सुरू ठेवून दुकानात वातावरण गरम ठेवत असल्याचे दिसून येत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी
पुढील बातमी
रायगड समुद्रात मासेमारी बोट बुडाली

संबंधित बातम्या