पल्स वाढवतेय वाहनधारकांची पल्स : गणेश अहिवळे

नगर रचनाच्या अटी-शर्तींना केराची टोपली; कारवाईची गरज

by Team Satara Today | published on : 01 September 2025


सातारा : सातारा शहरात नव्याने दिमाखात पारंगे चौकात उभे राहिलेले पल्स हॉस्पिटल त्याच्या पार्किंगच्या असुविधेमुळे वाहनधारकांची पल्स वाढवत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. या इमारतीच्या पार्किंगची रचना पाहिल्यास जागा मालकाने त्याच्या सुविधेसाठी सातारा पालिकेच्या नगर रचना विभागाच्या अटी शर्तींना केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येते. याप्रकरणी जागामालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सातारा शहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना अहिवळे यांनी सांगितले की, सातारा सदरबझार परिसर तसा अद्ययावत रुग्णालयांनी परिपूर्ण आहे. त्यातच शहरातील पारंगे चौकात काही महिन्यांपूर्वी पल्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नामक काचांनी अच्छादित मोठ्या वास्तूची धडाक्यात सुरुवात करण्यात आली. अद्ययावत सुविधांमुळे साहजिकच रुग्णांचा राबता येथे सुरु झाला. येथे येणारे रुग्ण काही रिक्षामध्ये बसून येणारे नसून चारचाकीतून येणारे असणार, याचा अंदाज बांधून हे हॉस्पिटल बांधताना पुरेशा पार्किंगची सोय करणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीच झाले नाही. या महाशयांनी सातारा पालिकेला दाखवलेल्या पार्किंगच्या जागेचा फायदा स्वत:च्या स्वार्थाकरीता करुन घेत पार्किंगमध्येच बांधकाम केले आहे. जे नगर रचना विभागाच्या अटी-शर्तींना कोलदांडा घालणारे आहे.

पार्किंगमध्ये पुरेशी जागा नसल्याने येथे रुग्णांना घेवून येणारे रुग्णांचे आप्तेष्ट रस्त्यावरच गाड्या पार्क करु लागले आहेत. सातारा शहरातील पोवई नाका ते जुना आरटीओ रस्ता हा विस्तारला गेल्याने येथून जाणार्‍या वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सातार्‍यातील वर्दळीचा तो रस्ता ठरला आहे. पर्यायाने येथे दुभाजकांची निर्मिती करुन तो सुरक्षित करण्यात आला आहे. मात्र, पल्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेवून येणारे, वा रुग्णांच्या भेटीसाठी येणार्‍यांच्या गाड्या पार्किंगच्या अभावाने रस्त्यातच पार्क होत असल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या अन्य वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

वास्तविकत: या इमारतीमध्ये 18 ते 24 दुचाकी आणि 6 चारचाकी गाड्या पार्क करण्याचे मंजूर करण्यात आले आहे. मात्र असे असताना या रुग्णालयातील पार्किंगच्या जागेत रिसेप्शन, कॅज्युलिटी, मंदीर, सिक्युरीटी, कॅन्टीन असल्याने याठिकाणी पार्किंगसाठी अत्यंत तोकडी जागा उरत आहे. 

या सर्व बाबी पाहता गणेश अहिवळे यांनी याबाबत सातारा पालिकेशी संपर्क साधला असता पालिकेतून केवळ थातूरमातूर उत्तरे देवून तसेच मूळ प्रश्‍नाला बगल देण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या अधिकार्‍यांनाही या समाजसेवकांनी मंजूर रेखांकनासह या हॉस्पिटलची पाहणी करण्याची विनंती केली असता केवळ वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत. याबाबत सातारा पालिकेने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा शहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सामूहिक पाऊल
पुढील बातमी
भाजी मंडईतून एकाच दिवशी ६ मोबाईलची चोरी

संबंधित बातम्या