एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा; महिलेसह तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 April 2026


कराड : एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने असे मिळून 2 लाख 55 हजार 543 रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात दोन महिलांसह तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत पांडुरंग निकम (रा. मराठानगर, ता. खटाव, जि. सातारा) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून शोभा महादेव चव्हाण (रा. पाटीलवाडी, म्हासोळी, ता. कराड), महादेव जयसिंग देसाई (रा. आरेवाडी, ता. कराड) व आशाताई शिवाजी पाटील (रा. म्हासोली, ता. कराड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत निकम यांना संशयित आरोपी शोभा चव्हाण हिने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रोख रक्कम व दागिने घेतले. यामध्ये महादेव देसाई व आशाताई पाटील यांचाही सहभाग आहे.

यानंतर संशयित आरोपींनी वेळोवेळी पैशांची गरज असल्याचे सांगत एकूण 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम घेतली. तसेच सुमारे 65 हजार 543 रुपयांचे सोन्याचे दागिनेही घेतले. यामध्ये दोन जोड्या बांगड्या, एक जोड टॉप्स, दोन वेल आणि मंगळसूत्राचा समावेश आहे. एकूण 2 लाख 55 हजार 543 रुपयांचा ऐवज फिर्यादी भरत निकम यांच्याकडून घेतला. जानेवारी 2020 पासून हा प्रकार सुरू होता. मात्र, ठरल्याप्रमाणे लग्न न करता संशयित आरोपी शोभा चव्हाण हिने टाळाटाळ सुरू केली. तसेच घेतलेली रक्कम व दागिने परत देण्यास नकार दिल्याने फिर्यादीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर फिर्यादीने याबाबत पोलिसांत तक्रार दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पद्म पुरस्कार शिफारस समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश
पुढील बातमी
उन्हाळी हंगामासाठी सातारा विभागातून एसटीच्या जादा फेऱ्या; प्रवाशांनी जादा बसेसचा लाभ घ्यावा - विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड

संबंधित बातम्या