फलटण : कोळकी, ता. फलटण येथील नरसोबा नगर परिसरातील मोनिता संस्कृती अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित असलेला गुटखा तसेच सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार फलटण शहर पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ही कारवाई संशयाच्या भोवर्यात सापडली असून पोलिसांनी व अ.औ. प्रशासनाने या कारवाईमध्ये मुख्य आरोपींनाच कॉर्नर केल्याने या कारवाईमध्ये सेटलमेंट झाल्याची चर्चा आज फलटण शहरात चांगलीच चर्चिली गेली.
याबाबत माहिती अशी, काल दि. 17 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातार्यातील अ.औ. प्रशासनाने फलटण शहरातील उपनगर असलेल्या कोळकी येथील नरसोबा नगर परिसरातील मोनिता संस्कृती अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर सातारा येथील अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली अप्पासाहेब खापणे यांच्यासह कर्मचार्यांनी पंच व साक्षीदारांसमवेत रात्री साडेआठच्या सुमारास धाड टाकली. यावेळी श्रीमती खापणे यांनी संशयितांच्या फ्लॅटची बेल वाजवली. परंतू संशय आल्याने संशयितांनी फ्लॅटचा दरवाजा उघडण्यास स्पष्टपणे नकार दिला. बराच वेळ झाला तरी संशयितांनी दरवाजा न उघडल्याने खापणे यांनी फलटण शहर पोलिसांना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच संबंधितांनी दरवाजा उघडला. यावेळी पोलीस पथकासह अ.औ. प्रशासनाच्या अधिकार्यांनी घराची झडती घेतली असता त्यांना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे सहा किलो वजनाचा विमल पानमसाला, दोन किलो वजनाची गुटख्यात मिसळण्यात येणारी सुगंधी तंबाखू, दोन किलो आरएमडी मसाला, रजनीगंधा फ्लेवर पानमसाला, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा आणि पाच किलो खर्रा, असा एकूण साडेसोळा किलो वजनाचा प्रतिबंधित गुटखा व त्याला लागणारे साहित्य दिसले. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची बाजारभावाप्रमाणे मूल्य 41 हजार 180 इतकी आहे.
यावेळी पोलिसांनी फ्लॅटमध्ये मिळून आलेल्या एका महिलेला व तिच्या सज्ञान मुलाला ताब्यात घेतले. परंतू प्रतिबंधित असलेला गुटखा विकणारा मुख्य आरोपी म्हणजेच ताब्यात घेतलेल्या महिलेचा पती किरण शशिकांत दोशी रा. कोळकी, फलटण हा वाजेगांव, ता. फलटण येथे किराणा मालाचे दुकान चालवतो. याच दुकानातून तो गुटख्याची विक्री करत असतो. फलटण शहर पोलिसांनी अ.औ. प्रशासनाच्या सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली खापणे यांच्या तक्रारीनुसार किरण शशिकांत दोशी याच्यासह विमल पानमसाला उत्पादक कंपनी विसधार्थ इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (तुमकूर, कर्नाटक), वि-1 टोबॅको उत्पादक व्हीआरजी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (तुमकूर, कर्नाटक), आरएमडी पानमसाला उत्पादक धारीवाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (बेंगळुरू, कर्नाटक), एम सेंटेड टोबॅको उत्पादक एव्हरक्र्वेस्ट इंडस्ट्रीज एलएलपी (बेंगळुरू, कर्नाटक), रजनीगंधा पानमसाला उत्पादक धरमपाल सत्यपाल लिमिटेड (सोनीपत, हरियाणा) आणि तुलसी रॉयल जाफरानी जर्दा उत्पादक डी. एस. चेविंग प्रॉडक्ट्स एलएलपी (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) यांच्या मालक, भागीदार व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी प्रथमदर्शनी ज्यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी प्रतिबंधित गुटखा आढळून आलेल्या फ्लॅटवर छापा टाकला त्यावेळी एका महिलेला व तिच्या सज्ञान मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वास्तविक किरण दोशी याच्यासह त्याची पत्नी व मुलावरही गुन्हा दाखल होणे गरजेचे असताना फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये त्या महिलेला व मुलाला गुन्ह्यातून वगळण्यासाठी मोठी आर्थिक तोड झाल्याची चर्चा फलटण तालुक्यात आहे.
या कारवाई दरम्यानचे व्हिडिओ फुटेजही ‘सातारा टुडे’च्या हाती लागले आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर अशा जुजबी कारवाया करुन चालणार नाही. याबाबत सातारा येथील अन्न औषध प्रशासनाला आणि फलटण शहर पोलिसांनाही कोणीतरी सांगायला हवे.
अधिकार्यांनो, तुकारामांच्या काठीचा आवाज येणार नाही!
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून ते एक्शन मोडवर आले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभरात प्रतिबंधित असलेली अवैध गुटखा, अन्न पदार्थातील भेसळ करणारे तसेच हॉटेल आणि औषध व्यावसायिकांवर कारवाईचा आसूड ओढत मुंडे चांगलेच चर्चेत आले आहेत. अधिकारी असावा, तर तुकाराम मुंडेंसारखा, असे आबालवृद्ध म्हणत आहेत. म्हणूनच सातारा जिल्ह्यातील निद्रिस्त असलेला अन्न व औषध प्रशासन विभागही ऍक्शन मोडवर आलेला आहे. गेली अनेक वर्षे प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा जिल्ह्यातील खेड्यापाड्यासह शहरातील पान टपर्यांवर दिवसाढवळ्या विकला जातोय, हे माहित असूनही हा विभाग गांधारीच्या भूमिकेत होता. मात्र, तुकाराम मुंडेंनी आसूड ओढताच हा विभाग पायाला भिंगरी लावून जिल्हाभर फिरत आहे. काल फलटण शहरात झालेली कारवाई, हे फक्त हिमनगाचे टोक होते. मात्र, यामध्येही सराईत असलेल्या विभागाने आणि पोलिसांनी सेटलमेंट करुन गुटखा विक्रेत्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातल्याचा आरोप फलटण शहरातून होवू लागला आहे. या भानगडीची वार्ता वर बसलेल्या तुकारामांपर्यंत पोहोचल्यास तुकारामांचा बसलेल्या काठीचा आवाज सातारा येथील अन्न व औषध प्रशासन विभाग आणि फलटण शहर पोलिसांनाही येणार नाही, हे मात्र निश्चित.