सातारा : सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत खासदार उदयनराजे भोसले यांचे धक्का तंत्र नगरसेवकांनी अनुभवले .गेल्या 24 तासापासून या पदासाठी मनोज शेंडे यांचे नाव चर्चेत असताना फॉर्म भरण्याच्या वेळी ॲड. दत्ता बनकर यांना उदयनराजे यांनी अचानक संधी दिली. त्यामुळे पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बनकर यांची एकमताने निवड करण्यातआली आहे.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येऊन दुपारी साडेबारा वाजता पिठासन अधिकारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या नावाची घोषणा केली. सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला सर्व नगरसेवकांचे आदी संहिता नियम पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .वंदे मातरम आणि संहिता उद्देशिका वाचल्यानंतर निवड प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी बारा वाजता छाननी करून प्राप्त झालेला ॲड. दत्ता बनकर यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सादर केला. नगराध्यक्षांनी अर्ज माघारीची मुदत 15 मिनिटे देऊन त्यानंतर साडेबारा वाजता ॲड. दत्ता बनकर यांच्या नावाची घोषणा केली. यात सभेपूर्वी खासदार उदयनराजे भोसले स्वतः ॲड. दत्ता बनकर यांना घेऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या केबिनमध्ये दाखल झाले. भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रतोद निशांत पाटील यांनी हा अर्ज मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केला.
सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी एक वाजता प्रांत आशिष बारकुल यांच्याकडून सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष अमोल मोहिते यांना छाननी करून प्राप्त झालेले पाच स्वीकृत सदस्यांचे अर्ज सादर झाले. यामध्ये खासदार गटाचे शंकर माळवदे, पंकज चव्हाण,आमदार गटाचे रवींद्र पवार, सुनील भंडारी व रीना भणगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या सर्व निवडींचे सर्व नगरसेवकांनी बाकी वाजवून स्वागत केले. नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर यांनी स्वीकृत सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या वतीने सर्व सदस्यांना नगरपालिका अधिनियम 1965 च्या नियमावली पुस्तिकेचे वितरण करण्यात आले .
उदयनराजे भोसले यांच्या धक्कातंत्राची चर्चा
भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वजण एक आहोत कोणीही जवळचा आणि लांबचा असे काही नाही. काही प्रकरणाला चर्चा करून उगाच वाद वाढवू नका. शासकीय कामकाज आणि नेतृत्व कौशल्य या गोष्टी ध्यानात ठेवून तसेचपालिका कामकाजाच्या अनुभवानुसार अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये कोणालाही दुखावण्याचा कोणताही हेतू नाही मनोज शेंडेसुद्धा आमचेच आहे. माझे व त्यांचे बोलणे झाले आहे. मात्र ॲड बनकर यांनी नूतन नगरपालिकेच्या इमारतीसाठी केलेला पाठपुरावा यामुळे सातारकरांना नाममात्र शुल्कात प्रशस्त इमारत मिळाली तसेच त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मानं करून त्यांना या पदाची संधी देण्यात आली आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्टपणे आपल्या प्रतिक्रियेत सांगितले. तरीसुद्धा उदयनराजे भोसले यांच्या अचानक यू-टर्नची जोरदार चर्चा होती. मनोज शेंडे हे पहिल्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिले याची सुद्धा खासदार गटांमध्ये चांगली चर्चा झाली. दत्ता बनकर यांनी यासंदर्भात त्यांची भेट घेऊन नक्कीच त्यांची समजूत घालू असे आश्वासन दिले.