सातारा : साताऱ्यात नगरपालिकेकडून सुरू असलेल्या ओढा स्वच्छतेच्या कामादरम्यान एका दुर्मिळ आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कासवाचे दर्शन झाले. ‘शेड्यूल १’ या सर्वोच्च वन्यजीव संरक्षण श्रेणीत मोडणाऱ्या या कासवाची पाठ इतर सामान्य कासवांप्रमाणे कठीण नसून कातड्यासारखी मऊ (सॉफ्ट शेल) आणि लवचिक आहे. साताऱ्यात आढळलेले हे कासव अत्यंत दुर्मिळ असून ते वन्यजीव कायद्यानुसार ‘शेड्यूल १’ या श्रेणीत येते. रेस्क्यू टीमने या कासवाला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले असून सध्या ते वनविभागाच्या निगराणीखाली उपचार घेत आहे.
ओढ्यात दुर्मिळ कासव आढळल्याची माहिती श्रीरंग काटेकर यांच्याकडून मिळताच सातारा रेस्क्यू टीमचे मयूर तिखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. टीमने अत्यंत तत्परतेने या कासवाला सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. त्यानंतर प्राणीरक्षक ओंकार ढाले यांच्या मध्यस्थीने या कासवाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. वनविभागाकडून या कासवाची वैद्यकीय व आरोग्य तपासणी केली जात असून, लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक व सुरक्षित अधिवासात मुक्त केले जाणार आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये...
याची पाठ चमड्यासारखी मऊ असते. मान लांब आणि लवचिक असते. नाक नळीसारखे पुढे आलेले असते. लांब नाकामुळे पाण्यात न पोहता ते नाकाचा शेंडा बाहेर काढून श्वास घेऊ शकते. चपटे शरीर व पायांच्या पटलांमुळे ते पाण्यात वेगाने पोहते. रंग प्रामुख्याने तपकिरी आणि काळसर असतो. ते दलदल आणि चिखलव्याप्त क्षेत्रात अधिवास करतात. लहान मासे, बेडूक कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे.
वाघासारखे सर्वोच्च संरक्षण
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ‘शेड्यूल १’ मध्ये समाविष्ट असलेल्या प्राण्यांना वाघासारखेच कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे हे कासव घरात पाळणे, विहिरी किंवा तलावातून पकडणे, त्यांची वाहतूक करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरतो. अशा कासवांची शिकार किंवा तस्करी करताना आढळल्यास संबंधितास तीन ते सात वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची तरतूद आहे.
साताऱ्यात आढळले दुर्मिळ लांब मानेचे, मऊ पाठीचे कासव, रेस्क्यू स्क्वॉडकडून सुरक्षित रेस्क्यू, वनविभागाच्या निगराणीखाली उपचार सुरु
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा