सातारा : आठव्या शतकात मराठा तरुणींना लष्करी शिक्षणाबरोबरच पाठशाळा काढून त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देणारे सातारचे थोरले प्रतापसिंह महाराज हे समाज सुधारणा करण्यात अग्रेसर होते. म्हणूनच ते काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते, असे उद्गार जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनीही आज नागठाणे येथे बोलताना व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज डॉट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या 232 व्या जयंतीनिमित्त नागठाणे येथील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज व्याख्यानमालेत समाज सुधारक प्रतापसिंह महाराज व महाराष्ट्रातील समाज परिवर्तन या विषयावर विजय मांडके बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड होते.
कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या वर सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या समाज सुधारण्यांचा प्रभाव पडलेला होता. म्हणूनच त्यांनी आग्रहपूर्वक प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून उपेक्षित राहिलेल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा इतिहास लिहून घेण्याचे वचन घेतले आणि वचन दिल्याप्रमाणे प्रबोधनकार ठाकरे यांनी थोरल्या प्रतापसिंह महाराजांवरील ग्रंथ लिहिला.
प्रतापसिंह महाराज यांनी सातारा हे शहर अत्याधुनिक पद्धतीने पसरले, तसेच साताऱ्यात नवा राजवाडा, जलमंदिर पॅलेस यासारख्या वास्तू बांधल्या. सातारा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वरच्या डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले. तसेच संस्कृत मराठी बरोबरच इंग्रजी भाषेच्या ही अध्ययनाला उत्तेजन दिले. छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ प्रसिद्ध केले. सती बंदीचा कायदा सातारा संस्थानामध्ये केला. असे समाज सुधारक व प्रजाहितदक्ष राजे म्हणून प्रतापसिंह महाराज ओळखले जातात असे सांगून विजय मांडके यांनी एक सद्गुणी लोकोपयोगी काम करणारा लोककल्याणकारी राजा म्हणून प्रतापसिंह महाराज यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरानेच लिहिले पाहिजे, असे त्यांचे काम होते.
दुसरा बाजीराव पेशवा, तसेच बाळाजीपंत नातू यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या साथीने प्रतापसिंह महाराज यांच्या विरोधात कसा कट रचला. याबाबतही ऐतिहासिक दाखले देत विजय मांडके यांनी प्रताप सिंह महाराजांचे चरित्र व चारित्र्य श्रोत्यांपुढे सादर केले.
प्रतापसिंह महाराजांनी स्वतंत्र ग्रंथालय निर्माण केले. त्यांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या पत्नीने लोकार्पण केले. दूरदृष्टीचे असे हे राजे होते असे गौरवोद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. संतोष निलाखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शौकत आतार यांनी केले. आभार डॉ.राजाराम कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंखे, उपाध्यक्ष प्रदीप बर्गे, उद्योजक अक्षय जेधे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने विद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धात विविध कलाप्रकारात यश संपादन केल्यामुळे उद्योजक अक्षय जेधे यांनी सांस्कृतिक विभागासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.