सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सर्वपक्षीय निषेध

दोषींवर कारवाई करण्याची मागणी; शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 08 March 2025


सातारा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सातार्‍यात येथील पोवई नाका शिवतीर्थ परिसरात सर्वपक्षीय निषेध करण्यात आला. या प्रकरणात दोषींवर कारवाई होऊन संबंधितांना न्याय मिळाला पाहिजे, अशा आशयाचे फलक झळकावत सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जागतिक महिला दिनाचे सोहळे साजरे होत असताना जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिलांनीही एकत्र येत निषेध व्यक्त केला.

आंदोलनामध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा राष्ट्रवादी पक्ष तसेच इतर अनेक पक्षांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या भ्याड हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवतीर्थावर शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निषेध व्यक्त केला.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तरीसुद्धा राज्य सरकार मूग गिळून गप्प आहे. यामध्ये कोणतीच ठोस कार्यवाही होत नाही, असा आरोप यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला. भर दुपारी पोवई नाक्यावर संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मार्च महिन्यात जिल्ह्याचा पारा वाढला
पुढील बातमी
सातारा शहर पोलीस स्टेशनकडून नारी शक्तीचा सन्मान

संबंधित बातम्या