बारामती : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील तीन महिन्यांपासून राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
बीडमधील घटना आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "बीड जिल्ह्याला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. बीडमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा होता. मी स्वत: त्या भागात जेव्हा लक्ष देतो होतो, मी उभे केलेले सहा-सहा सदस्य तिथं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. जिल्ह्यात एकप्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. पण आता काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असून त्याचे परिणाम जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दिसत आहेत. जो कायदा हातात घेतो, तो कोण आहे याचा विचार न करता त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज आहे," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
राज्यात मागील काही महिन्यांपासून धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या घटनांवर बोलताना शरद पवार यांनी सरकारला आवाहन केलं आहे. "राज्यातील सरसकट वातावरण असं आहे, हे काय मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती बिघडली तर त्याच्या गैरफायदा घेणारे काही घटक आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कठोर भूमिका घ्यावी. जात आणि धर्म यातील अंतर कोणी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही," असं मत पवार यांनी मांडलं आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या नाराजीच्या प्रश्नावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "नाराजीच्या चर्चेवर काल जयंत पाटील यांनी बारामतीतच भाष्य केलं आहे आणि आज तुम्ही ते छापलंही आहे," असं पवार म्हणाले.