१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : पांडुरंग बलकवडे. फाशीचा वड येथे अभिवादन. कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना या लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केली. हा इतिहास केवळ स्मरणापुरता न ठेवता त्याचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी समजण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
सातारा नगरपरिषद आणि राष्ट्र संवर्धन संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फाशीचा वड येथील हुतात्मा स्मारकस्थळी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधले. यंदाचा हा १६९ वा अभिवादन कार्यक्रम राष्ट्रभावनेने भारलेल्या वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठा सत्तेचा विस्तार, त्यानंतर ब्रिटिश सत्तेचे आगमन आणि स्वातंत्र्यलढ्याची वाटचाल यांचा ऐतिहासिक संदर्भ मांडला. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात सातारा परिसरातील लढवय्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत या लढ्यात १७ नरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या ऐतिहासिक घटनांमधून नवीन पिढीला प्रेरणा मिळू शकते. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा अभ्यास अधिक व्यापक पद्धतीने होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपाध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर, मुख्याधिकारी जळक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकाशराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अशोक रेमझे यांनी स्वागत केले. ॲड. रेश्मा वाळिंबे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.नगरसेविका भारती शिंदे, गोसावी, नगरसेवक धनंजयभाऊ जांभळे, विश्वजित बालुगडे, अक्षय जाधव, किर्दत, मुकुंदराव आफळे, अमित कुलकर्णी, महेश शिवदे, रवीराज गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एआय मॉर्फिंगवरून साताऱ्यात राजे समर्थक आक्रमक; शिवेंद्रसिंहराजेंचा फोटो नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
पुढील बातमी
बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळे सज्ज; विसर्जनासाठी पालिकेची यंत्रणा अलर्ट; नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडून सुविधांची पाहणी

संबंधित बातम्या