सातारा : सातारा शहरानजीकच्या क्षेत्र माहुली येथे जमिनीच्या वादातून रिव्हॉल्व्हर मधून हवेत फायरिंग झाल्याने परिसर हादरून गेला. फायरिंग झाल्यानंतर याठिकाणी तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, पोलिसांनी फायरिंग करणार्यास अटक करून रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. सातार्याजवळ घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजयसिंह सर्जेराव जाधव वय 60, रा. क्षेत्र माहुली, सातारा असे फायरिंग करणार्याचे नाव असून याप्रकरणी रविराज देशमुख वय 28 रा. क्षेत्र माहुली, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कानपूर मेड पॉईंट 32 च्या रिव्हॉल्व्हर मधून हा फायर करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी रविराज देशमुख व विजयसिंह जाधव यांच्यामध्ये जमिनीचे वाद आहेत. गेली अनेक वर्षे हा वाद धुमसत आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रविराज देशमुख हे रानात काम करायला गेल्यानंतर तेथे विजयसिंह जाधव हे आले. जमिनीच्या वादातून दोघांमध्ये पुन्हा वादावादीला सुरुवात झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर विजयसिंह जाधव यांनी रिव्हॉल्व्हर काढत थेट हवेत फायरिंग केले. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसर हादरून गेला व तणावाचे वातावरण निर्माण झाले.
गोळीबार झाल्याचे समजल्यानंतर जमाव आला व त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. लाकडी दांडक्याने ही मारामारी झाल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला. या मारामारी मध्ये महिलांचाही समावेश होता. अवघ्या दहा मिनिटांमध्ये गोळीबार व हाणामारी झाल्याची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत संबंधितांची धरपकड केली आणि गोळीबाराची माहिती घेऊन परिसर सील केला. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून हवेत फायर झालेली पुंगळी पोलिसांनी जप्त केली आहे.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित विजयसिंह जाधव यालाही ताब्यात घेऊन रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.
गोळीबार व मारामारीच्या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या सर्व घटनेने परिसरात व क्षेत्र माहुली येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.