सातारा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच होणार सुरुवात

by Team Satara Today | published on : 09 July 2025


सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा यांची आधुनिक स्वरूपात पुनर्बांधणी करावी, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीनुसार दोन्ही कामांना शासनस्तरावरून मंजुरी मिळालेली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, सातारा विभागाचे विभाग नियंत्रक विकास माने, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, विभागीय अभियंता प्रियांका काशिद, सातारा आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक स्वाती बांद्रे, सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित बापट, सुनिल काटकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, सातारा बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे बस स्थानक असून, येथे येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांची व प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकास आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गांची आवश्यकता आहे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती इमारतीच्या बाजूच्या रस्त्यावर रँप तयार करण्यात यावा, अशी सूचना सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिली आहे, जेणेकरून वाहनांना आणि अपंग प्रवाशांना अधिक सुलभता मिळेल. काम चालू असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही कामे दर्जेदार व जलदगतीने पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत लवकरात लवकर उपलब्ध व्हावीत, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वस्तातील प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्टीत खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे मे महिन्यात एसटीच्या प्रवासी आरक्षणाचा टक्का वाढला. यंदाच्या मे महिन्यात १२ लाख ३३ हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून एसटी प्रवासाला प्राधान्य दिले. महत्वाचे म्हणजे, ई-शिवाई आणि वातानुकूलित शिवनेरीतून प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांनी प्राधान्य दिले आहे. विविध योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होताना दिसत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळून ३ जणांचा मृत्यू
पुढील बातमी
युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे ?

संबंधित बातम्या