सातारा : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी गावच्या हद्दीतील पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक असतानाच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हस्तक्षेप करत शनिवारी बोराटवाडी येथे तातडीची बैठक बोलावली असून, तोपर्यंत काम थांबविण्याचे निर्देश दिल्याने शुक्रवारी सकाळी सुरू झालेले काम अखेर बंद करण्यात आले.
वडाचीवाडी येथील पुलाचे काम दीर्घकाळ अर्धवट अवस्थेत असल्याने परिसरात सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काही दिवसांपूर्वी संयुक्त हलगी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २२ मेपासून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दुसऱ्या बाजूला वडाचीवाडी येथील माजी सरपंच अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले होते. ठेकेदार कंपनीकडे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांची सोडवणूक होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी पोलीस प्रशासनासमोर स्पष्ट केली होती. दोन दिवस चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला होता.
शुक्रवारी सकाळी ठेकेदार कंपनीचे प्रकल्प समन्वयक श्रीकांत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली कामासाठी यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करण्यात आले. याचवेळी ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेत कामाला विरोध सुरू केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्या, त्या सोडविण्यासाठी कंपनीमार्फत हमीपत्र दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीत महामार्गाचे काम थांबवू नका, अशी विनंती त्यांनी केली. मात्र ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत प्रश्न सुटल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी अजित भोसले, रोहिदास भोसले, विठ्ठल भोसले, राहुल भोसले, नरेंद्र भोसले, गोरख भोसले, महेश भोसले, सुहास भोसले, गणेश भोसले, दशरथ भोसले, शशिकांत भोसले, भगवान भोसले सुधीर भोसले. अविनाश नलगे, आनंदा भोसले, ओंकार सकुंडे आणि शशिकांत माने यांनी प्रशासनासमोर विविध प्रश्न उपस्थित केले. सुमारे दोन ते अडीच तास चर्चा सुरू होती, मात्र दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्या.
दरम्यान, अजित भोसले यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वडाचीवाडी येथील सद्यस्थितीची आणि महामार्गाच्या कामाच्या परिस्थितीची माहिती दिली. आमदार शिंदे यांनी पोलीस निरीक्षक देवकर यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अजित भोसले यांनी थेट मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संवाद साधून ग्रामस्थांच्या भावना व नाराजी निदर्शनास आणून दिली.
मंत्री गोरे यांनी पोलीस निरीक्षक देवकर यांच्याशी चर्चा करून शनिवारी बोराटवाडी येथील निवासस्थानी तातडीची बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांचा आदर ठेवून काम बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ठेकेदार कंपनीने सुरू केलेले काम तात्काळ थांबविले.
ठेकेदार कंपनीने पुलाच्या परिसरात जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून सुरक्षा बॅरिकेट उभारले आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो आणि महामार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.