सातारा : हवामान खात्याने यंदा देशात पर्जन्यमान कमी राहण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
कोरेगाव पंचायत समिती सभागृहात सोमवारी दुपारी एक वाजता तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपालीताई शिवाजीराव गुरव, उपसभापती रवींद्र पवार, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, गटविकास अधिकारी सौ. सुप्रिया चव्हाण यांच्यासह पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार शिंदे यांनी सर्व विभागांनी समन्वय साधून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महसूल व इतर संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना आखाव्यात. आगामी काळात करावयाच्या कामांचे प्रस्ताव आठ दिवसांत पंचायत समिती कार्यालयात सादर करावेत, असे निर्देश देताना या अहवालाच्या आधारे तालुक्याचा सविस्तर आराखडा तयार करून पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.