सातारा : शनिवारी रात्री न्हाळेवाडीत लहान मुलावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाने नरभक्षक बिबट्यासाठी परिसरात २१ ट्रॅप कॅमेरे लावले. २८ पिंजरे लावले, तसेच ड्रोन कॅमेऱ्यांमधूनही बिबट्याचा शोध घेतला जात आहे. तरीही त्याचा गेल्या चार दिवसांत मागमूस लागलेला नाही. बिबट्याने ट्रॅप कॅमेऱ्यांनाही हुलकावणी दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिवथर, मालगाव, न्हाळेवाडी, राऊतवाडी, रेवडी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागातर्फे २८ पिंजरे लावण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यासह २१ ट्रॅप कॅमे-यांद्वारे बिबट्याचा शोध सुरू आहे. तसेच वन विभागाचे २५ कर्मचारी परिसरातील शेतशिवार पिंजून काढत आहेत. तरीही बिबट्या सापडत नसल्याने या परिसरातील शेतक-यांची चिंता वाढली आहे.
शेतात पाणी पाजण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. शेतातील वस्त्यांवर स्थानिकांची वर्दळ सुरू असते. अनेकांना मजुरीच्या कामासाठीही जावे लागते. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे काम थांबवून घरी बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान, बिबट्या दिसत असल्याच्या अफवांचे पीक सध्या परिसरात वाढले आहे.
नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी खबरदारी बाळगून सतर्क राहावे. कोणत्याही अफवेला बळी पडू नये. तसेच बिबट्या आढळल्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती द्यावी. - संदीप झोपाळे - वनरक्षक
न्हाळेवाडी परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांमधून शोध; मात्र नरभक्षक बिबट्याचा चार दिवसांत मागमूस नाही; परिसरात भीतीचे वातावरण
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा