बामणोली : जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पुष्प पठार सध्या विविधरंगी फुलांनी बहरले असून, निसर्गसौंदर्याचा हा अद्भूत सोहळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार, रविवार आणि गणेश चतुर्थी अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने कास पठारावर पर्यटकांची संख्या प्रमाणात वाढली. त्यामुळे फुलांनी बहरलेल्या पठारासोबतच पर्यटकांनीही कास परिसर फुलून गेला आहे. पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन समितीकडून विविध विभागांची आखणी केली आहे. यासाठी पुरुष, महिला, तरुण मुले आणि मुली अशा एकूण १६८ कर्मचाऱ्यांचा ताफा नियोजित केला आहे. पर्यटकांचे नियोजन, मार्गदर्शन आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे.
पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आला असून, विविध प्रकारच्या फुलांनी संपूर्ण पठार रंगीबेरंगी झाले आहे. सध्या चवर, तेरडा, आभाळी, नभाळी, निलिमा, टूथब्रश, आमरी, सोनकी, भारंगी, विघ्नहर्ता, गवेली, जरतारी, थिरमिर, कंदील पुष्प, रोशरा, निचुरडी, राणजिरा, जैनी, अबोलीमा, फुलकांडी, फुलदाणी आदी फुलांच्या प्रजाती पूर्ण क्षमतेने फुलल्या आहेत. विशेषतः पठारावर उमललेला गुलाबी रंगाचा तेरडा आणि चवर पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. विविधरंगी फुलांच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असून, कासच्या निसर्गसौंदर्याची छायाचित्रे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
पठारावर पर्यटकांना प्रवेश देण्यासाठी चारही प्रवेशद्वारांची व्यवस्था केली आहे. यावर्षी संपूर्ण पठारावर ठिकठिकाणी विविध प्रेक्षणीय पॉईंट तयार करण्यात आल्याने पर्यटकांना फुलांचा बहर अधिक जवळून अनुभवता येत आहे. दाट धुके, अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस आणि हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पठारावरील वातावरण आल्हाददायक झाले आहे. या रम्य वातावरणात पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
ऑनलाईन बुकिंग फुल्ल; ऑफलाईनही गर्दी
पठारावर रोज ऑनलाईन प्रवेशाची मर्यादा तीन हजार पर्यटकांपर्यंत आहे. सुट्ट्यांमुळे ऑनलाईन बुकिंग लवकरच पूर्ण झाले. त्यामुळे काही पर्यटकांनी ऑफलाईन प्रवेशाचा पर्याय स्वीकारत फुलांचा आनंद घेतला. वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या नियोजनासाठी प्रशासन आणि वन समितीकडून विशेष व्यवस्था केली आहे.
इलेक्ट्रिक बसला वाढता प्रतिसाद
राजमार्ग ते कुमुदिनी तळे या दोन किलोमीटर अंतरावर पर्यटकांच्या ये-जा करण्यासाठी गतवर्षी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून चार छोट्या इलेक्ट्रिक बस सुरू केल्या. या बसला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या पर्यटकांची संख्या वाढल्याने चारही बस अपुऱ्या पडत आहेत.
कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात; पर्यटकांनी कास परिसर फुलून गेला, पर्यटकांच्या सेवेसाठी १६८ कर्मचाऱ्यांचा ताफा
by Team Satara Today | published on : 14 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा