सातारा : दरोडा, जबरी चोरी, लुटमार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुंभारवाडा केसरकर पेठ येथील सराईत तडीपार गुन्हेगार बॉबी उर्फ सॅमसंग अँथनी ब्रुक्स याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चारभिंती परिसरात पाठलाग करून पकडले. ही कारवाई दोन दिवसापूर्वी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बॉबी उर्फ सॅमसंग याने 29 जून 2024 रोजी नगरपालिकेजवळ त्याच्या अन्य साथीदारासमवेत एका युवकाला अडवून त्याला बेदम मारहाण केली होती. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या त्या युवकाच्या चुलत्याला सुद्धा संबंधितांनी बेदम मारहाण करून जखमी केले होते. बॉबी गेल्या काही महिन्यापासून सातार्यात आढळून येत नव्हता. पोलिसांच्या बातमीदाराने तो कात्रज येथे असल्याची माहिती दिली होती. तो सराईत गुन्हेगार असल्याने आपली ओळख लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. सातारा पोलिसांनी पुणे, कात्रज, नवले ब्रिज, नर्हे, पिंपरी चिंचवड, निगडी अशा विविध ठिकाणी त्यासाठी शोध मोहीम राबवली होती. सातारा पोलिसांना दोन दिवसापूर्वी बॉबी पुन्हा सातार्यात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी चारभिंती परिसरामध्ये दोन पथकांचा सापळा रचला.
पहाटेच्या सुमारास बॉबी उर्फ सॅमसंग अँथनी बुक्स हा चारभिंती परिसरात एका ठिकाणी आला असता तो आपल्याला कोणी ओळखणार नाही, अशा पद्धतीने वावरत होता. पोलीस आपल्या मागे असल्याचा संशय आल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरले व त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. बॉबी ब्रूक्स याची कसून चौकशी सुरू असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, सुनील मोहिते, पंकज मोहिते, सागर गायकवाड, सचिन रिटे, तुषार भोसले, सुशांत कदम, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.
तडीपार सराईत गुंडाला चारभिंती परिसरात पकडले
दोन महिने फरार असलेल्या आरोपीस अटक; सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
by Team Satara Today | published on : 23 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा