उत्तर प्रदेशमध्ये आढळला एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रूग्ण

महाकुंभ सोहळ्याआधीच चिंतेचे वातावरण

लखनौ : एचएमपीव्ही मुळे चीनमध्ये दहशतीचं वातावरण आहे, तर भारतातही याबाबत देखरेख सुरू करण्यात आली आहे. कोविड-19 व्यतिरिक्त या विषाणुची लहान मुलांना लागण होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. दरम्यान देशात अनेक शहरांमध्ये या व्हायरसचे काही रूग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातमध्ये या व्हायरसशी सबंधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आता उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात देखील या एचएमपीव्ही व्हायरसचे रूग्ण आढळून आला आहे. महाकुंभ सोहळ्याआधी अशा प्रकारचा रूग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लवकरच उत्तरप्रदेशमध्ये महाकुंभ होणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 12 रूग्ण आढळून आले आहेत. लखनौ येथे एका 60 वर्षीय महिला या आजाराने बाधित झाली आहे. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे समजते आहे.

तीर्थराज आणि त्रिवेणी संगम असलेल्या प्रयागमध्ये लवकरच महाकुंभ सुरू होणार आहे. त्याची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कडाक्याच्या थंडीत देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ऋषी, संत आणि महात्म्यांचा मेळा प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लखनौमध्ये एचएमपीव्ही चा रूग्ण आढळून आल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान या व्हायरसमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

एचएमपीव्हीची लक्षणे सामान्य सर्दी आणि फ्लू सारखी आहेत. यामुळे मानवाच्या फुफ्फुसात आणि श्वसनमार्गामध्ये संसर्ग होतो. अशा आजारांनी किंवा ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना या विषाणूची लागण होणे खूप सामान्य आहे. लहान मुले सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांना सहज बळी पडतात. अशा परिस्थितीत, मुलांमध्ये या विषाणूचा प्रसार अगदी सामान्य आहे. केवळ भारतातच नाही तर चीनमध्येही एचएमपीव्हीची सर्वाधिक प्रकरणे लहान मुलांमध्ये दिसून आली आहेत.

चीनमधील मुलांमध्ये आढळलेल्या एचएमपीव्हीची प्रकरणे लक्षात घेऊन, भारतीय सशस्त्र दलाचे माजी क्षेत्र महामारी तज्ज्ञ डॉ. अमिताव बॅनर्जी म्हणाले, ‘चीनमधील सध्याची परिस्थिती रोगप्रतिकारक शक्तीमुळे आहे. याचा अर्थ असा की, महामारीच्या काळात, अनेक मुलांना त्यांच्या सुरुवातीच्या महिन्यांत अनेक प्रकारच्या विषाणूंचा सामना करावा लागला नाही आणि आता ते त्यांच्याविरूद्ध प्रतिकारशक्तीच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत.

मागील बातमी
लॉस एंजेलिसमध्ये १० जणांचा होरपळून मृत्यू, १० हजार घरे जळाली
पुढील बातमी
जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहात सुरुवात

संबंधित बातम्या