सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने राज्यातील एक लाख 180 बूथ 1280 मंडल व महाराष्ट्राच्या 27 हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातून या निर्णयाच्या अंमलबजावणीची तयारी झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
यावेळी माजी शहराध्यक्ष विकास गोसावी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले देशात सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्वत जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून सुरू होत आहे., भारतावर इंग्रजांचे राज्य असताना 1919 मध्ये जात निहाय जनगणना इंग्रज सरकारने केली होती, मात्र त्यानंतर तत्कालीन परिस्थितीत जनगणना होऊ शकले नाही. जातनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आता का गप्प बसले आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मागणी करून घसा कोरडा करणारे नेते केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचे औदार्य दाखवत नाहीत आणि नाक मुरडत घाणेरडे राजकारण करत आहेत असा आरोप कदम यांनी केला. जात निहाय जनगणनेच्या माध्यमातून 3000 जातींची अचूक जनगणना होऊन एक निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. बिहारमध्ये जातनिहाय पाहणी करण्यासाठी भाजपने पाठिंबा दिला होता 1951 ते 2011 या काळात जेवढ्या जनगणना झाल्या त्यात अनुसूचित जाती-जमातीची आकडेवारी दिली गेली, मात्र इतर मागास प्रवर्गाची आकडेवारी कधीच समोर आली नाही. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस व इतर विरोधी पक्षनेते हा आपलाच अजेंडा आहे आणि आमच्या सरकारच्या दबावामुळे सत्तारूढ सरकार ने हा निर्णय घेतल्याची दर्पोक्ती करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वसामान्यांचे आहे, सर्वसामान्यांचा सरकारला पाठिंबा आहे त्यामुळे अशा अफवांना मी भीक घालत नाही. या जनगणनेच्या माध्यमातून विविध जातींचे सखोल सर्वेक्षण होऊन केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ अल्पसंख्यांक जातींना देणे शक्य होणार आहे, यामागे कुठलाही राजकीय पूर्व हेतू नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच एफआरपी च्या दृष्टीने केंद्र शासनाने प्रति टन दीडशे रुपये ज्यादा देण्याचे केंद्र सरकारने कबूल केले आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा अपप्रचार केला जातो. मात्र त्यात तथ्य नाही, हे या निर्णयाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात निहाय जनगणनेचा निर्णय घेऊन एका नव्या आश्वासक पर्वाची सुरुवात केली आहे. त्याबद्दल ते निश्चित अभिनंदनच पात्र आहे असे कौतुक धैर्यशील दादा कदम यांनी केले. भाजप जिल्हा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात प्रदेश कार्यकारणी कडून अहवाल अंतिम करण्यात येऊन ते नाव जाहीर करण्यात येईल या संदर्भातील नाव जाहीर होईल त्या पदस्थ व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी आम्ही बांधील आहोत असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.