पाचगणी : महाबळेश्वर आणि पाचगणी या जागतिक पर्यटन स्थळांसह परिसरातील सुमारे २५ गावांची तहान भागवणाऱ्या वेण्णा लेकच्या पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. ५६ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता केवळ १० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हा साठा जेमतेम ५० ते ५२ दिवस पुरेल, असा अंदाज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
त्यातच मॉन्सून लांबल्यामुळे पर्यटन स्थळांवरील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला असून, सर्वांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. यंदा उन्हाळ्याचा कडाका आणि पर्यटकांची विक्रमी गर्दी यामुळे वेण्णा लेकमधील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जून महिना सुरू झाला, तरी पावसाने दडी मारल्यामुळे धरणाने अक्षरशः तळ गाठला आहे.
सध्या महाबळेश्वर शहराला दररोज २७ लाख लिटर आणि पाचगणी शहराला २२ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासत आहे. पाणी संकट गडद होऊ नये म्हणून प्राधिकरणाने आधीच दोन्ही शहरांमध्ये दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, पाऊस जितका लांबेल, तितकी ही चिंता अधिक गडद होणार आहे.
पाचगणी शहराला वेण्णा लेकमधून नैसर्गिक उताराने थेट पाणी पोहोचवले जाते. हे पाणी शहरासमोरील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर ‘मजीप्रा’मार्फत नळांद्वारे त्याचे वितरण होते; परंतु सध्याच्या घटत्या पाणी पातळीमुळे हे वितरण सुरळीत ठेवणे प्रशासनाला जिकिरीचे ठरत आहे. जर पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली, तर या पर्यटन क्षेत्राला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
पाऊस दिवसेंदिवस लांबत चालल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. पाचगणी आणि महाबळेश्वरमधील सर्व ग्राहकांनी, नागरिकांनी पिण्याचे उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने आणि जपून वापरावे.
-प्राजक्ता करनाळे, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.
आम्ही दोन्ही शहरांना जास्तीतजास्त आणि समप्रमाणात पाणीपुरवठा करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. या टंचाईच्या काळात मुख्य जलवाहिन्या किंवा नळांना कुठेही पाणी गळती होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनीही पाणी वाया न घालवता प्रशासनाला सहकार्य करावे.
-आनंदराव तराळ, अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.