मसूर : मसूर व परिसरातील शासनाच्या रस्ते विकासास मसूरकरांचा विरोध नाही. मात्र, नागरी वस्तीत कोणाचेही नुकसान न करता पूर्वीच्या आहे त्या गटरच्या हद्दीवर सात मीटरने रस्ता झाल्यास व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. मात्र नागरी क्षेत्रात दहा मीटरचा कोणी घाट घालत असेल तर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यास कडाडून तीव्र विरोध असेल. तसेच जोर जबरदस्तीने मसूरचे विद्रुपीकरण करून व्यवसाय उद्ध्वस्त होऊन कुटुंबे रस्त्यावर येणार असतील तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मसूर नागरी क्षेत्र बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला.
पाटण-मसूर-पंढरपूर व कराड-मसूर रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या रस्ते विकासाबाबत कोणाचाही विरोध नाही. मात्र शासनाने नागरी वस्ती व अनागरी क्षेत्र याचा विचार करता जिथे नागरिक क्षेत्र आहे, तेथे सात मीटरने रस्ता रुंदीकरणाचे शासनाचे धोरण असेल तर त्याचे स्वागत आहे. त्यास कुणाचा विरोध नाही. मात्र नागरी वस्तीत दहा मीटरचा घाट घालून गेली कित्येक वर्ष लहान-मोठे व्यवसायिक व दलित वस्तीमधील घरे उद्ध्वस्त होणार आहेत. एवढेच नव्हे तर मसूरच्या उर्वरित व्यापार पेठेचा चेहराही विद्रूप होणार आहे.
नागरी वस्तीत कोणाचे नुकसान होऊ नये याची दक्षता शासनाने घेऊन दोन्ही रस्त्याकडील पुर्वीचे नाले धरून काम करावे. शासनाने रेल्वे पूल ज्या अंतराने केला त्या अंतराने रस्ता व्हावा. तसेच मसूरचे जुने पोलीस स्टेशन ते पश्चिमेकडील गणपती मंदिर, कराड-मसूर पुलाखालील जुना ओढा ते जुने बसस्थानक चौकापर्यंतचे क्षेत्र नागरीवस्ती धरून रस्ता रुंदीकरणास कोणाचाही विरोध नाही. कोणाचेही नुकसान होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी. तसेच नागरी वस्तीमध्ये पूर्वीच्या मोहरी आहेत. त्याच ठिकाणी काम करावे, अशा लोकशाही मार्गाने सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारी तसेच ग्रामस्थांच्या मागण्या आहेत.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक लहूराज जाधव, स्व. पी. डी. पाटील बँकेचे संचालक बाळासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, माजी उपसरपंच सावळाराम कांबळे, शिवसेनेचे शिरोळ इचलकरंजी पक्षनिरीक्षक तात्यासाहेब घाडगे, प्रा. कादर पिरजादे, भाजपचे तालुका सरचिटणीस जयवंतराव जगदाळे, माजी उपसरपंच प्रकाश जाधव, माजी उपसरपंच शांताराम मोरे, ग्रा. पं. सदस्य सुनील जगदाळे, दलित समाजाचे नेते बाजीराव वायदंडे यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.