सातारा : सायबर फसवणुकीतील आंतरराज्य टोळीचे कनेक्शन साताऱ्यात पोहोचले असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, एका तरुणाने कमिशनपोटी देशभरातील वेगवेगळ्या बँकांच्या खात्यांतून आलेली तब्बल ८९ लाख ९४ हजारांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात स्वीकारली. एवढेच नव्हे तर ही संपूर्ण रक्कम त्याने काढून सायबर चोरट्यांच्या स्वाधीन केली. त्याने कमिशन स्वीकारल्याचेही पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी सातारा सायबर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (वय ३५, रा. खिंडवाडी, ता. सातारा) व त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या खिंडवाडीतील एका तरुणाच्या बँक खात्याच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने सातारा सायबर सेलला दिली. यानंतर सायबर सेलने प्राथमिक तपास केल्यानंतर यात धक्कादायक माहिती समोर आली.
संशयित ज्ञानेश्वर जाधव याने किसान क्रॉप फर्टिलायझर या नावाने बँकेत करंट अकाउंट काढले. या अकाऊंटवर त्याने तब्बल ८९ लाख ९४ हजार ७१० रुपयांची रक्कम स्वीकारली. देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पाच जणांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली होती. तीच रक्कम जाधवच्या बँक खात्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा सायबर पोलिसांनी जाधव याची माहिती घेतल्यानंतर सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आले.
दोघा संशयितांची मुंबईत बैठक !
संशयित ज्ञानेश्वर जाधव याची किसान फर्टिलायझरची फर्म आहे. या फर्मची छोटी-मोठी कामे तो करत होता. याचवेळी त्याची ओळख वाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणाशी झाली. त्या तरुणाने त्याला मुंबईत नेले. तेथे गोपनीय मीटिंग झाल्यानंतर म्हणे, खात्यात पैशांचा ओघ सुरू झाला. सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम संशयिताने एटीएम व इतर मार्गाने काढली असल्याचेही सायबर पोलिस सांगत आहेत. सध्या दोघेही फरार असून, त्यांना अटक झाल्यानंतरच या टोळीमध्ये साताऱ्यातील आणखी कोणी आहे काय? आणखी काही बँक खात्यांचा वापर झाला आहे काय? व त्यांना किती कमिशन मिळत होते? हे समजणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कमिशनच्या मोहातून बनले गुन्हेगार
सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील शेकडो तरुणांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यांचा गैरवापर केला आहे. बचत खात्यांसाठी प्रत्येकी पाच ते १० हजार रुपये, तर करंट अकाऊंटसाठी २५ ते ३० हजार रुपये कमिशन दिले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.